22.21 लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्ता सील
मनपाची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका

अमरावती /5 जून : अमरावती शहरात मालमत्ता कर थकवणार्यांवर महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. आयुक्त वर्षा लेकुरवाळे यांच्या आदेशानुसार शहरात विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत असून, आज मध्य झोन क्रमांक दोन अंतर्गत राजपेठ भागात मोठी कारवाई करण्यात आली. येथील एका मालमत्ताधारकाकडे तब्बल 22 लाख 21 हजार 126 रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी होती. वारंवार नोटिसा बजावून आणि सूचना देऊनही संबंधित मालमत्ताधारकाने कराचा भरणा टाळला. अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही मालमत्ता सील केली आहे.शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या बळकटीकरणासाठी मालमत्ता कर हा उत्पन्नाचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या मालमत्तांवर प्रशासन आता विशेष लक्ष ठेवून आहे. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने जप्ती, सीलिंग आणि इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब सुरू केला आहे. आजच्या या कारवाईत मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुस्तक यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाने सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून मालमत्तेवर सील लावले.यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, निरीक्षक फैय्याज खान, वसुली लिपिक सुरज चावरे, स्वप्नील रामसे, धरम बिवार्ड आणि विशाल ढिक्याड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या मालमत्ताधारकांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांनी विलंब न करता तातडीने कर भरावा. अन्यथा, आगामी काळात कोणतीही सवलत न देता मालमत्ता जप्ती व सीलिंगसारखी कठोर कारवाई केली जाईल. महसूल वाढीसाठी आणि शहर विकासासाठी यापुढेही वसुली मोहिमेचा धडाका असाच कायम राहणार आहे. कर भरून आपल्या शहराच्या विकास कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




