नवसारी वसतिगृह भ्रष्टाचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्

सहा महिन्यांपासून फाईल थंड बस्त्यात, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

अमरावती/12 मे: नवसारी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता संशयाचे गडद सावट लाभले असून, हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याची तीव्र चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. तक्रार दाखल होऊन तब्बल सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदारावर विविध मार्गांनी दबाव टाकून तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे, तर काही तथाकथित मध्यस्थांनी या प्रकरणात उडी घेत संबंधित वसतिगृहाची कामे आपल्या ताब्यात घेतल्याने ‘सेटिंग’ करून संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.विद्यार्थिनींच्या हक्काचा निधी लाटल्याचे गंभीर आरोप असताना, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांचे संरक्षण केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाचे हे सातत्याने दिसणारे मौन आता केवळ निष्क्रियतेचे नसून, जाणूनबुजून घेतलेली भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे प्रकरण दडपण्यासाठीच वेळकाढूपणा केला जात आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक संघटना आणि संतप्त नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोघांनीही एकमेकांविरोधातील तक्रारी घेतल्या मागे-याप्रकरणी मुख्य तक्रारदार संजय सोळंके यांनी वसतिगृह प्रमुखांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सोळंके विरोधात वसतिगृह प्रमुखांनी सुद्धा अनेक आरोप करणारी तक्रार दाखल केली होती मात्र दोघांनीही आपापल्या तक्रारी मागे घेऊन प्रकरणावर तूर्तास पडदा टाकण्यात आला आहे.
तक्रादारावर कोणताही दबाव आणला नाही-नवसारी वस्तीगृह प्रमुख पटेल यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी तक्रारदारावर कुठलाही दबावतंत्राचा वापर केला नसल्याची माहिती दिली.तर तक्रारदार संजय सोळंके यांच्याशी संपर्क केला असता ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

Back to top button