मेळघाटची तहान भागवा नाहीतर खबरदार?
उच्च न्यायालयाची सरकारला तंबी

प्रशासनाला प्रत्येक गावात टँकर पाठविण्याचे आदेश
मुबंई/29 एप्रिल – विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्याने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली असून पारा 45 अंशांच्या पार गेल्याने मेळघाटची माती होरपळून निघाली आहे.
दुर्गम भागातील गोरगरीब जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासन नेमके काय करतेय, असा संतप्त सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. माणसे मरत असताना शांत बसणार का? अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले असून मेळघाटातील प्रत्येक गावात दररोज किमान एक पाण्याचा टँकर पोहोचलाच पाहिजे, असा कडक आदेश दिला आहे. मेळघाटात कुपोषणामुळे होणार्या बालमृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये, त्यातच आता भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. सामाजिक कार्यकर्ते बंडू साने आणि त्यांच्या सहकार्यांनी या नरकयातनांविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वनेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे वकील जुगल गिल्डा यांनी धारणी, चिखलदरा आणि चुरणी भागातील दाहक वास्तव मांडले. निसर्गाचे सर्व स्त्रोत कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावकर्यांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने या गंभीर परिस्थितीवरतीव्र संताप व्यक्त केला. मेळघाटातील जनता पाण्यासाठी तडफडत असताना सरकार पुढच्या आदेशाची वाट का पाहत आहे, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सरकारकडून तातडीने पावले उचलली जात असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने प्रशासनाला कोणताही विलंब न लावता टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे बजावले आहे. पुढील सुनावणीत ठोस माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून 7 मे पर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे. मेळघाटातील तहानलेल्या घशांना पाणी देण्यासाठी आता प्रशासनाला पळावेच लागणार आहे.
पाण्यासाठी मेळघाटचा रणकंदन आणि संघर्ष-मेळघाटातील रणरणत्या उन्हात पाण्याचा थेंब न मिळणे हा मानवाधिकाराचा मोठा भंग आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे डोंगरदर्यातील आदिवासींवर ही वेळ ओढवली असून न्यायालयाने आता चाबूक ओढल्याने यंत्रणा जागी झाली आहे. प्रत्येक थेंबासाठी चाललेली ही लढाई आता केवळ जगण्याची नसून अस्तित्वाची बनली आहे.




