अमरावतीच्या ठाणेदाराची भररस्त्यात बायकोला मारहाण
अकोल्यात पतीकडून सुविद्य पत्नीची बेदम धुलाई

दुसर्या महिलेवरून राडा; ‘खाकी’च्या अब्रूचे भरचौकात धिंडवडे
अकोला/24 एप्रिल– कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच एका पोलीस निरीक्षकाने कायद्याची लक्तरे भररस्त्यात वेशीवर टांगली आहेत. अमरावती येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने आपल्या पत्नीला भररस्त्यात केस पकडून ओढत नेले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे.
या पोलीस अधिकार्याचे दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध असून, त्यावरून जाब विचारला असता त्याने स्वतःच्या पत्नीची विटंबना केली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वार्यासारखा पसरल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीवरून अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आता या ’खाकी’ वर्दीतील गुंडावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित पोलीस निरीक्षक आणि तक्रारदार महिलेचे लग्न 2013 मध्ये झाले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच या नराधम पतीने पैशांसाठी पत्नीचा छळ सुरू केला होता. या छळाला कंटाळून पत्नीने यापूर्वीच 2015 मध्ये तक्रार दिली होती, ज्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, हा पोलीस अधिकारी एका दुसर्या महिलेच्या प्रेमात पडला असून त्याने तिच्याशी गुपचूप लग्न केल्याची कुणकुण पत्नीला लागली होती. ती महिला अकोल्यातील एका लग्न समारंभात येणार असल्याची पक्की खबर मिळताच, पीडित पत्नी आपल्या बहिणीला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचली. अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील ’साहू मंगल कार्यालया’समोर हा हायव्होल्टेज ड्रामा घडला. पोलीस निरीक्षक आपल्या आईसह आणि त्या दुसर्या महिलेसोबत बाहेर पडताच पत्नीने त्यांना गाठले. आपल्या संसाराची राखरांगोळी करणार्या पतीला जाब विचारताच, या पोलीस निरीक्षकाने सैतानाचे रूप धारण केले. त्याने भररस्त्यात लोकांसमोर पत्नीला शिवीगाळ करत तिचे केस धरून तिला खाली पाडले आणि बेदम मारहाण सुरू केली. विशेष म्हणजे, या कृत्यात त्याची आई म्हणजेच पीडितेची सासू आणि त्या दुसर्या महिलेनेही साथ दिली. पत्नीला वाचवण्यासाठी तिची बहीण मध्ये पडली असता, या पोलीस अधिकार्याने तिलाही मारहाण करत तिचा वनयभंग केला. या मारहाणीचा थरार पाहून प्रत्यक्षदर्शीही हादरून गेले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास चक्र वेगाने फिरवली असून, वर्दीचा माज दाखवणार्या या अधिकार्याला आता कायद्याचा हिसका मिळणे निश्चित मानले जात आहे.
समाजमाध्यमांवर ’राड्याचा’ व्हिडिओ व्हायरल-या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे, कारण या संपूर्ण मारहाणीचे चित्रण एका कॅमेर्यात कैद झाले आहे. ज्यामध्ये पोलीस निरीक्षक आणि त्याची आई पीडित महिलेला भररस्त्यात ओढताना स्पष्टपणे दिसत आहेत. ही चित्रफीत आता तपासाचा मुख्य पुरावा ठरली असून, यामुळे पोलीस प्रशासनाला आपल्याच अधिकार्याविरुद्ध कठोर पावले उचलणे भाग पडले आहे.




