महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक: अमरावती जिल्ह्यात 26 ला मतदान

जिल्हाधिकार्‍यांचे मतदानाचे आवाहन

अमरावती/23एप्रिल: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नऊ सदस्यांच्या निवडीसाठी येत्या 26 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 2565 नोंदणीकृत डॉक्टर या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी श्रीकृष्णा पेठ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात चार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पाच पथके आणि 25 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान 26 एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडेल. प्रत्येक मतदाराला नऊ मते देण्याचा अधिकार आहे. मतदानासाठी येताना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सोबत आणणे प्रत्येक डॉक्टरांसाठी अनिवार्य आहे. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाचे इतर छायाचित्रित ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. विवाहित महिलांनी नावात बदल असल्यास तसा अधिकृत पुरावा सोबत ठेवणे गरजेचे आहे. मतदारांच्या सुविधेसाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, तो स्कॅन करून मतदारांना आपला अनुक्रमांक सहज शोधता येणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेळकर यांनी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना या लोकशाही प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button