नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या

आयुक्त वर्षा लड्डा यांचा विविध ठिकाणी पाहणी दौरा

* अधिकार्‍यांना कडक निर्देश

अमरावती /16एप्रिल: अमरावती । विशेष प्रतिनिधी शहराचा श्वास गुदमरणार्‍या वाहतूक कोंडीची बाधा आणि गल्लोगल्ली साचलेल्या अस्वच्छतेच्या ढिगार्‍यांची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी पहाटेपासूनच शहराच्या विविध भागांत मोहिमेचा धडाका लावला. केवळ कार्यालयात बसून आदेश न सोडता, आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणेला कामाला जुंपल्याने दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारतानाच, सामान्यांना तातडीने सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या धडक मोहिमेची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून (इर्विन) झाली. तेथून आयुक्तांचा ताफा आयएमए हॉल, कॅम्प परिसर, रोज गार्डन, सायन्स कोअर मैदान, उस्मानिया मशीद ते थेट मालवीय आणि जयस्तंभ चौकापर्यंत पोहोचला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी बारीकसारीक उणिवांची पाहणी केली. खापर्डे बगीचा, बस स्थानक मार्ग, हमालपुरा आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांमुळे रस्ते अरुंद होऊन सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे चित्र दिसताच, आयुक्तांनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे फर्मान सोडले. विशेषतः अंबादेवी मंदिर ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मार्गावर रात्रीच्या वेळी बसणार्‍या अवैध फेरीवाल्यांवर त्यांनी कडक ताशेरे ओढले. राजकमल चौक, उड्डाणपूल आणि गोरेगावकर परिसरातही हीच स्थिती आढळली. केवळ कारवाईवर न थांबता आयुक्तांनी शहर सुशोभीकरणाचाही कानमंत्र दिला. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, आरोग्य अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, बाजार परवाना विभागाचे मंगेश कडू, उपअभियंता लक्ष्मण पावडे, जयंत काळमेघ, अतिक्रमण प्रमुख योगेश कोल्हे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक श्रीकांत डवरे, उद्यान निरीक्षक मुकेश खारकर आणि शहर समन्वयक श्वेता बोके यांच्यासह अनेक अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button