आशाताईंच्या संगीताने सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली/12 एप्रिल : भारतीय संगीतातील बुलंद आवाज आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भारतीय संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काही फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील. असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले की, आज प्रत्येक भारतीयासाठी आणि खासकरून माझ्यासारख्या संगीतप्रेमींसाठी एक दुःखद दिवस आहे, कारण आपल्या लाडक्या आशा भोसले आता आपल्यात नाहीत. आशाताईंनी फक्त आपल्या मधुर आवाजाने आणि अतुलनीय प्रतिभेने एक वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर आपल्या सुमधुर गीतांनी भारतीय संगीताला समृद्धही केले. संगीताच्या प्रत्येक प्रकारात स्वतःला जुळवून घेण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेने सर्वांची मने जिंकली. आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती यांसारख्या अनेक भाषांवर, तसेच लोकगीतांवरही अमिट ठसा उमटवला. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आशाताईंचा आवाज त्यांच्या स्वभावाइतकाच मृदू होता आणि त्यांचा स्वभावही तितकाच साधा, मनमिळाऊ होता. जेव्हा कधी आम्ही त्यांना भेटायचो, तेव्हा संगीत आणि कला यांसारख्या विविध विषयांवर आमच्यात खूप गप्पा होत होत्या. आज त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांचा आवाज आपल्या हृदयात कायम राहणार आहे. ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती असे म्हणत त्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या

Back to top button