अमरावती विद्यापीठाने केला आहे आशा भोसले यांचा ‘डी.लिट’ ने सन्मान
तिसर्या दीक्षांत सोहळ्यात पदवी बहाल

* प्रा. बी.टी. देशमुख, डॉ. देविसिंह शेखावत यांनी मांडला होता प्रस्ताव
* प्रथम कुलगुरू डॉ.के.जी. देशमुख यांच्या हस्ते गौरव
अमरावती/12एप्रिल: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवारी मुंबई येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपल्या जादुई आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणार्या आशा भोसले या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुमारे 38 वर्षांपूर्वी त्यांना डी. लिट ही मानद उपाधीने सन्मानित केले होते. त्यावेळच्या आठवणी आता जाग्या झाल्या आहेत.
अमरावती विद्यापीठाची स्थापना 1 मे 1983 रोजी झाली. सुरूवातीच्या काळात विद्यापीठाचे कामकाज त्यावेळच्या विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात चालत होते. ज्येष्ठ नेते माजी विधान परिषद सदस्य प्रा. बी.टी. देशमुख, माजी आमदार डॉ. देविसिंह शेखावत, प्राचार्य डॅडी देशमुख हे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर होते. डॅडी देशमुख यांचे चित्रपट सृष्टीशी आणि मंगेशकर कुटुंबीयांशी संबंध होते. आशा भोसले यांना डी.लिट देऊन त्यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव डॅडी देशमुख यांनी मांडला होता. त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला होता. आशा भोसले यांनला ही उपाधी अमरावती विद्यापीठाच्या तिसर्या दीक्षांत सोहळ्यात अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली होती, अशी माहिती अमरावती विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर फुले यांनी दिली.
काय म्हणाल्या होत्या आशा भोसले?
सन्मान स्वीकारण्यासाठी आशा भोसले या अमरावतीला आल्या होत्या. विदर्भ महाविद्यालयाच्या प्रांगणातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आशा भोसले म्हणाल्या होत्या, वर्हाड आणि अमरावतीने मंगेशकर कुटुंबीयांना नेहमीच साथ दिली आहे. माझे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे अनेक कार्यक्रम अमरावती शहरात होत होते. अमरावतीकर प्रेक्षकांनी सातत्याने मदत केली, असे माझी आई नेहमीच सांगत होती. मी जास्त शिकलेली नसतानाही अमरावती विद्यापीठाने माझा सन्मान केला, सर्वांची मी ऋणी आहे. डॉ. किशोर फुले यांनी या कार्यक्रमातील आठवणींना उजाळा दिला.




