इर्विन चौकातील पेट्रोल पंपाजवळ कचर्याला आग
श्रीकृष्ण पेठेतील घटनेने उडाली खळबळ

* खबरदारी म्हणून दोन तास पेट्रोल पंप बंद
अमरावती/30 मार्च – शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या इर्विन चौकातील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या मागील सर्व्हिस गल्लीत रविवारी दुपारी भीषण आग लागली. उन्हाचा पारा 41 ते 42 अंशांवर असताना लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, परिसरातील सजग नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग वेळीच विझवण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
श्रीकृष्ण पेठ भागातील या गल्लीत कचर्याच्या ढिगार्याने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळा वाढू लागल्याने विनोद राठी, कोमल बोथरा, विवेकानंद गाजले, बालाजी बाबडे, राजेश अग्रवाल यांसह अन्य नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. पेट्रोल पंप जवळच असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तो काही काळ बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, शहरातील सर्व्हिस गल्ल्यांच्या साफसफाईकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.




