मंगलधाम परिसरातील कुंटणखान्यावर छापा

दामिनी पथकाची शहरात कारवाई

* सुदेश शेंडेसह तीन महिला ताब्यात

अमरावती /27 मार्च : शहरातील विविध उच्चभ्रू वस्त्यांपासून ते गजबजलेल्या परिसरांपर्यंत अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने कुंटणखाने सुरू असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अलीकडेच चित्रा कॉलनी परिसरात दामिनी पथकाने केलेल्या कारवाईनंतर पोलीस सतर्क असल्याचे दिसत असले तरी, ही कारवाई केवळ मोजक्याच ठिकाणी होत असल्याने नागरिकांमध्ये आता दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.
अमरावती शहरात देहविक्रीचा व्यवसाय फोफावत चालल्याचे चित्र आहे. अनेक गल्लीबोळात आणि भाड्याच्या घरांमध्ये हा अनैतिक व्यापार राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या दामिनी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून गुन्हेगारांना जेरबंद केले असले, तरी शहराच्या कानाकोपर्‍यात पसरलेले हे जाळे उपटून टाकण्यासाठी ही पावले तोकडी पडत असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. जर दामिनी पथकाने खर्‍या अर्थाने आणि सातत्याने शहरात शोध मोहीम राबवून मोठी कारवाई सुरू केली, तरच अमरावती शहर या देहविक्रीच्या विळख्यातून मुक्त होऊ शकेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. केवळ तक्रारीची वाट न पाहता संशयास्पद ठिकाणांवर पोलिसांनी स्वतःहून जरब बसवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अमरावतीची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून आहे, मात्र अशा प्रकारांमुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता याकडे गांभीर्याने बघून सर्वच अवैध अड्ड्यांचा कायमचा बंदोबस्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकभावनेचा कौल-शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांमुळे कौटुंबिक वातावरणावर वाईट परिणाम होत आहे. दामिनी पथकाने आपली व्याप्ती वाढवून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर कडक नजर ठेवावी आणि शहर देहविक्रीमुक्त करावे, अशी आग्रही मागणी अमरावतीकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button