8 महिन्यांची गर्भवती चढली मृत्यूच्या डोंगरावर

भर उन्हात जीवावर उदार झाली माऊली

* शहरात काळजाचा ठोका चुकवणारी थरारक घटना

अमरावती /22 मार्च : शहरातील न्यू हायवे खदान परिसरात आज दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत गंभीर घटना घडली. भर उन्हात एका आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येच्या उद्देशाने थेट डोंगराचा कडा गाठला. डोंगरमाथ्यावर मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही माऊली पाहून परिसरातील नागरिकांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. निसरड्या वाटा आणि उंच कडा असूनही, ती महिला जिवावर उदार होऊन वर चढली होती. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा न करता अत्यंत चाणाक्षपणे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.पी. गणेश शिंदे, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डोंगराच्या उंच कड्यावर जीव मुठीत धरून उभी असलेल्या त्या गर्भवतीला वाचवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. डोंगराळ भाग आणि महिलेची नाजूक अवस्था लक्षात घेता, जवानांनी अत्यंत संयमाने बचावकार्य सुरू केले. माणुसकीच्या नात्याने आणि कर्तव्याच्या भावनेने पोलीस पथकाने शिताफीने डोंगर सर केला. अखेर, त्या माऊलीला सुखरूप ताब्यात घेऊन खाली उतरवण्यात यश आले. या यशस्वी मोहिमेनंतर तिला तातडीने उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या थरारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र सुखरूप सुटका होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
खाकी वर्दीत धावून आले देवदूत-खदाणीच्या धोकादायक परिसरात आणि कडक उन्हात गर्भवती महिलेचे प्राण वाचवणे ही मोठी परीक्षा होती. पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह फ्रेजरपुरा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे आज एक मोठा अनर्थ टळला. पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button