महापालिकेत कामगारांच्या घामाची चोरी जोरात

कंत्राटदारांकडून भविष्यनिर्वाह निधीचा मोठा अपहार

* महानगरपालिका प्रशासनाचे आर्थिक गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष

अमरावती /22 मार्च : स्तानिक महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेचे आणि मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट घेतलेल्या संस्थांकडून गोरगरीब कामगारांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कामगारांच्या हक्काचा भविष्यनिर्वाह निधी आणि राज्य विमा योजनेचे पैसे न भरता कंत्राटदार स्वतःचे खिसे भरत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव समीर जवंजाळ यांनी भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. या गंभीर तक्रारीमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या संगनमतानेच हा लुटीचा कारभार सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणार्‍या आणि विविध विभागात राबणार्‍या कंत्राटी कामगारांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. अमरावती महानगर पालिकेत ’गोविंदा सफाई कामगार संस्था’ आणि ’महात्मा फुले बेरोजगार सेवा सहकारी संस्था’ यांसारख्या अनेक संस्थांना कामगारांचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. नियमानुसार, प्रत्येक कामगाराच्या वेतनातून कापला जाणारा भविष्यनिर्वाह निधी आणि विमा योजनेचा हिस्सा सरकारी खात्यात जमा करणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे. मात्र, या संस्थांनी कामगारांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कामगारांना कायद्याप्रमाणे पूर्ण वेतन न देता केवळ अर्धेच वेतन हातावर टेकवले जात आहे. महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी या कंत्राटदार संस्थांच्या देयकाची पडताळणी न करताच बिले मंजूर करत असल्याने हा भ्रष्टाचार अधिक फोफावला आहे. भविष्यनिर्वाह निधीचा परतावा भरल्याची खात्री न करताच सरकारी तिजोरीतून कंत्राटदारांना पैसे वाटले जात आहेत. यामुळे रक्ताचे पाणी करून शहर स्वच्छ ठेवणार्‍या कामगारांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या प्रकरणी दोषी कंत्राटदारांवर कडक फौजदारी कारवाई करून कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्याची मागणी आता जनसामान्यातून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button