महिनाभराच्या उपासनेनंतर आज केली जाणार रमजान ईदची नमाज

सकाळी 8:45 वाजता होणार सामूहिक पठण

* मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

अमरावती /20 मार्च – पवित्र रमजान महिन्यातील 30 रोजे आणि 5 जुम्मा पूर्ण झाल्यानंतर, उद्या 21 मार्च रोजी शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. आज संध्याकाळी मगरीबच्या नमाजनंतर चंद्रदर्शन होताच ’चाँद रात’ साजरी केली जाईल. शनिवारी सकाळी 8:45 वाजता स्थानिक ईदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज अदा केली जाणार आहे.
यावर्षी मुरादाबाद येथून आलेले मौलाना सईद अख्तर मुरादाबाद हे ईदच्या नमाजचे इमामपद भूषवणार आहेत. या सोहळ्यासाठी मशिद मिस्कीनशहा मियाँ ट्रस्ट आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने ईदगाह मैदानावर स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या 19 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा उपासनेचा महिना आज पूर्ण झाला असून, आज शेवटच्या जुम्माच्या नमाजानंतर भाविकांनी अत्यंत जड अंतःकरणाने या पवित्र महिन्याला निरोप दिला. शहरातील बाजारपेठांमध्येही ईदनिमित्त मोठी गर्दी दिसून येत आहे. कपडे, शिरखुरम्यासाठी लागणारी शेवई, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. उद्याच्या नमाजनंतर देशात शांतता, प्रगती आणि बंधुभाव टिकून राहावा, यासाठी विशेष प्रार्थना (दुआ) केली जाणार आहे. प्रशासनाकडूनही ईदनिमित्त शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बाजारपेठेत खरेदीचा उत्साह

ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील मुस्लिम बहुल भागांसह मुख्य बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. महिनाभराच्या कडक उपवासानंतर येणार्‍या या सणामुळे व्यापार्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण असून सर्वत्र मोठी आर्थिक उलाढाल दिसून येत आहे.

Back to top button