श्रुती मते यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
कर्करोग रुग्ण आणि अंध विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी मिळाला सन्मान

* समाजसेवेचा वसा जपत अमरावतीच्या लेकीचा पुण्यात गौरव
पुणे /20 मार्च – अमरावतीची सुकन्या आणि निस्वार्थ समाजसेवेचा वसा घेतलेल्या श्रुती विजय लकडे मते यांना सन 2026 चा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे आनंदी विश्व संस्थेच्या वतीने आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. प्रशासकीय व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतलेल्या श्रुती मते गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहेत. विशेषतः कर्करोग ग्रस्तांना विनामूल्य मदत आणि अंध विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करून त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांतून अनेक तरुणांना जगण्याची नवी उमेद मिळत आहे. या कार्यक्रमाला गणेश विटकर, अभिनेत्री नेहा पाटील आणि अपूर्वा परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सन्मान अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




