महिला लोकप्रतिनिधींच्या कर्तृत्वाचा गौरव
सशक्त समाज घडवण्यासाठी आरोग्यम् हॉस्पिटलचा पुढाकार

* नगरसेविकांच्या सामूहिक सत्काराने जागतिक महिला सप्ताहाचा दिमाखदार समारोप
अमरावती /19 मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती येथील ’आरोग्यम् मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या वतीने नवनियुक्त महिला नगरसेविकांचा भव्य सामूहिक सत्कार सोहळा पार पडला. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाढत असलेला सहभाग हा स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा असून, महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या 47 महिला प्रतिनिधी शहराच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवतील, असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला. 8 ते 15 मार्च दरम्यान हॉस्पिटलच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा समारोप या प्रेरणादायी सोहळ्याने झाला. सातूर्णा परिसरातील हॉस्पिटलच्या सुसज्ज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक किरण हातगावकर होते, तर ’ओलावा फाउंडेशन’चे राजेंद्र टेंबे, शुभदा पोतदार आणि डॉ. रोहित हातगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन लोक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सुरेखा लुंगारे, डॉ. अर्चना आतराम, डॉ. मधुरा कहाळे, प्रीती रेवणे, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, नंदा सावदे, पद्मजा कौंडण्य, मंजूषा जाधव, लता देशमुख, रजनी डोंगरे आणि गौरी मेधवानी या नगरसेविकांचा समावेश होता. सत्काराला उत्तर देताना सुरेखा लुंगारे यांनी वैद्यकीय क्षेत्रातून अशा प्रकारे महिला शक्तीचा सन्मान होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब असल्याचे नमूद केले. नगरसेविका मंजूषा जाधव यांनी आरोग्यम् हॉस्पिटलच्या सामाजिक हॉस्पिटलचे संचालक किरण हातगावकर यांनी ’प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी’ या हॉस्पिटलच्या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार केला, तर राजेंद्र टेंबे यांनी ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोहित हातगावकर यांनी केले. त्यांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधा आणि भविष्यातील सामाजिक योजनांचा आढावा मांडला. या सोहळ्याचे नेटके संचालन आहारतज्ज्ञ डॉ. ऋतुजा शिंगरू यांनी केले, तर आभार डॉ. श्रावणी भुगुल यांनी मानले. पसायदानाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली.




