राष्ट्रीय स्तरावर अमरावतीचा मान उंचावला

किरणताई महल्ले यांचा महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते सत्कार

अमरावती /19 मार्च अमरावती शहरासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरलेल्या घटनेत, माजी महापौर किरणताई महल्ले यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. किरणताई महल्ले यांच्या निवडीमुळे अमरावतीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
समाजातील वंचित, मागासवर्गीय आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य, त्यांची निष्ठा, जिद्द आणि समाजसेवेची अखंड तळमळ ही अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी सांगितले. किरणताई महल्ले यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण अमरावती शहराचा सन्मान आहे. त्यांच्या नेतृत्वातून समाजहिताचे प्रभावी निर्णय होतील आणि राष्ट्रीय पातळीवर अमरावतीचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना किरणताई महल्ले यांनी मिळालेल्या सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त करत, मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button