बायपास सर्जरी ‘फ्री’
आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा!

मुंबई/16 मार्च – महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बायपाससह विविध मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. या योजनांचे नियम पाळत नसलेल्या किंवा रुग्णांकडून पैसे उकळणार्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या दोन्ही आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. आपल्या मतदारसंघातील विठ्ठल कदम नावाच्या शेतकर्याला बायपास शस्त्रक्रिया करावी लागणार असून या शस्त्रक्रियेसाठी साधारण अकरा लाख रुपये खर्च येतो, असे त्यांनी सांगितले.




