पत्नीने केली दारुड्या पतीची हत्त्या

डोक्यात जड वस्तूने प्रहार करून केला खात्मा

वलगाव ठाण्याहद्दीतील खारतळेगाव येथील घटना

अमरावती /11 मार्च : स्थानिक वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या खारतळेगाव येथे आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार घडला. दारूच्या नशेत रोज होणार्‍या छळाला कंटाळून एका हतबल पत्नीने आपल्याच पतीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मंगेश देवीदास गोटे (वय 42) असे मृताचे नाव असून, त्याच्या 33 वर्षीय पत्नीने रागाच्या भरात डोक्यात जड वस्तू मारून त्याला जागीच ठार केले. संसाराच्या गाड्यासाठी दिवसभर मजुरी करून घाम गाळणार्‍या माऊलीने अखेर संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंगेश गोटे याला दारूचे भीषण व्यसन जडले होते. दिवसभर नशेत धुंद राहणार्‍या मंगेशला आपल्या कुटुंबाची कोणतीही फिकीर नव्हती. त्याची पत्नी रात्रंदिवस मजुरी करून आपल्या 13 वर्षांच्या मुलीचा आणि 8 वर्षांच्या मुलाचा सांभाळ करत होती. मात्र, मंगेश रोज दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालून तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. आजही सकाळी नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत मंगेशने वाद उकरून काढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. यावेळी पत्नीच्या संयमाचा बांध फुटला आणि तिने घरातील एक जड वस्तू उचलून मंगेशच्या डोक्यावर काळजाचा थरकाप उडवणारा घाव घातला. या वर्मी प्रहारामुळे मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच श्वास थांबला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा केला असून वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
चिमुरड्यांची ओसाड झाली दुनिया-घरात रोज चालणारे आई वडिलांचे वाद आज बापाचा जीव घेऊन संपले. आई आता पोलीस कोठडीत असून व्यसनी बाप देवाघरी गेल्यामुळे त्या 8 आणि 13 वर्षांच्या मुलांच्या डोक्यावरचे छप्पर उडाले आहे. एका क्षणाच्या रागाने या हसत्याखेळत्या घराची राखरांगोळी केली असून खारतळेगाव पूर्णपणे सुन्न झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button