पापा पटेल हत्याकांडातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता

पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

* डॉ.मिर्झा वसीम यांचा प्रभावी युक्तिवाद

अमरावती / 11 मार्च – शहरातील बहुचर्चित संतोष ऊर्फ पापा पटेल हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2022 रोजी संतोष ऊर्फ पापा पटेल हा आपले मित्र लवकुश आणि पंकज यांच्यासोबत कंवरधामच्या दिशेने फिरण्यासाठी जात होता. यावेळी वाटेत अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या सोबत असलेल्या मित्रांनी सर्व हकिकत त्याच्या भावाला सांगितली. मात्र, भावाची प्रकृती ठीक नसल्याने त्याच्या मेहुण्याने पोलिसांना घटनेची माहिती देऊन पाच जणांची नावे सांगितली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुकेश मावे, निखिल परिहार, सौरव गाडेकर, अमन पसारे आणि सूरज मावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 341, 109, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाचा निकाल-खटल्याच्या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्यावतीने डॉ.मिर्झा वसीम अहमद यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी आरोपी क्रमांक 1 आणि 5 च्या वतीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची उलटतपासणी घेतली. यावेळी बचाव पक्षाने अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. या कामात त्यांना अ‍ॅड. आशिष चौबे आणि अ‍ॅड. अक्रम शेख यांचे सहकार्य लाभले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने पुराव्यांचा अभाव आणि संशयाचा फायदा देत पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

Back to top button