श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

अमरावती /9 मार्च : अमरावती-स्थानिक श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ’जागतिक महिला दिन’ मोठ्या थाटात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात स्त्रियांचे असलेले मोलाचे स्थान, त्यांचे सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे हा या सोहळ्याचा मुख्य हेतू होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून एन.टी.ए. अमरावतीचे संचालक श्री. अनुज भारती यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर काजोल निमकर मॅडम, राजेंद्र सर आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. पुष्पलता देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. पुष्पलता देशमुख यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद करतानाच स्त्रीशक्तीचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मुख्य वक्ते अनुज भारती यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. आजच्या आधुनिक काळात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला असून आत्मविश्वास आणि शिक्षणाच्या जोरावर त्या देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहेत, असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी स्त्री ही कुटुंब आणि समाजाचा कणा असल्याचे सांगत, महिला सक्षमीकरण ही समाज परिवर्तनाची मोठी शक्ती असल्याचे प्रतिपादन केले. क्रीडा, विज्ञान आणि उद्योगातील महिलांची प्रगती कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन डॉ. सरोजिनी उंबरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. अनुरागिनी बोके यांनी मानले. शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

संबंधित बातम्या

Back to top button