इराणचे 48 बडे नेते ठार

नवी दिल्ली /1 मार्च -इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता अमेरिका आणि इस्रायलच्या ऑपरेशन लायन्स रोअरने इराणला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी कारवाईत इराणच्या एकापाठोपाठ एक अशा 48 बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कोणालाही विश्वास बसणार नाही इतके मोठे यश आम्हाला मिळत आहे, असे विधान ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, इराणमधील अमेरिकन लष्करी मोहीम अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगाने पुढे सरकत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या या भीषण हल्ल्यात केवळ खामेनीच नव्हे, तर इराणच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळातील 48 प्रभावशाली नेते मारले गेले आहेत. यामध्ये रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे काही वरिष्ठ कमांडर आणि संरक्षण मंत्र्यांचाही समावेश असल्याचे समजते. हे अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त ऑपरेशन आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट इराणची आण्विक क्षमता नष्ट करणे आणि तिथली सत्तापालट करणे हे आहे. ट्रम्प यांनी या मोहिमेला ऐतिहासिक यश म्हटले असून, इराणचा प्रभाव मध्य आशियातून कायमचा संपवण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या नेत्यांच्या मृत्यूने संतप्त झालेल्या इराणने आता थेट युद्धाचे पाऊल उचलले आहे. कोम येथील पवित्र जामकरन मशिदीवर सूडाचा लाल झेंडाफडकवण्यात आला आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर डझनभर मिसाईल डागली आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया, कतार आणि ओमानमधील अमेरिकन तळांवर तणाव वाढला आहे.
इराणमध्ये आणीबाणी-खामेनी आणि 48 नेत्यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये सध्या पूर्णपणे गोंधळाची स्थिती असून तेथे 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या युद्धाचा भडका उडाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याहू यांनी, जोपर्यंत इराणचे संपूर्ण लष्करी जाळे उखडले जात नाही, तोपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीत, असा इशारा दिला.




