हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका
ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणार्या

मुंबई/1 मार्च -: दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच मॉडेलिंग क्षेत्रात काम करणार्या नवख्या कलाकार तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणार्या 27 वर्षीय दलाल अभिनेत्रीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी दिली. यावेळी दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे. हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालिस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने 28 फेब्रुवारीला दुपारी 2.35 वाजेच्या सुमारास मासुंदा तलाव भागात सापळा लावून अभिनेत्रीला अटक केली. ती स्वत: काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करीत असून तिच्यासोबत मॉडेलिंग आणि यू ट्युब चॅनलवर काम करणार्या तिच्या ओळखीच्या काही महिला आणि तरुणींना ती शरीर विक्रय करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचेही चौकशीत उघड झाले.




