स्थायी समितीच्या सभापतीची 6 मार्चला निवड
विभागीय आयुक्तांनी दिली निवड प्रक्रियेला मंजुरी

16 सदस्यीय समितीमध्ये महायुती भक्कम बहुमतात
अमरावती/27 फेब्रुवारी – अमरावती महानगरपालिकेच्या सत्ता कारणातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्या 16 सदस्यीय स्थायी समितीच्या सभापती पदाचा पेच आता सुटला आहे. विभागीय महसूल आयुक्तांनी या निवडीसाठी 6 मार्च ही तारीख निश्चित केली असून, याच दिवशी समितीची पहिली सभा पार पडणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली होती, तेव्हापासूनच नव्या सभापतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीचाच सभापती विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या 16 सदस्यीय समितीमध्ये भारतीय जनता पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ’महायुती’ भक्कम बहुमतात आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पद त्यांच्याकडेच राहणार हे निश्चित आहे. सत्तेच्या सूत्रानुसार भाजपने महापौर पद आणि युवा स्वाभिमानने उपमहापौर पद भूषवल्यामुळे, आता ’युती धर्म’ पाळत सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिन्ही घटक पक्षांमध्ये या पदासाठी पडद्यामागे मोठी रस्सीखेच सुरू आहे. पक्षनिहाय बलाबल आणि सदस्य:स्थायी समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक 5 सदस्य असून त्यात पद्मजा कौंडण्य, स्मिता सूर्यवंशी, मिलिंद बांबल, पंचफुला चव्हाण आणि विनोद तांदवसे यांचा समावेश आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 3 सदस्य ललिता रताववा, अस्मा फिरोज खान आणि प्रशांत महल्ले हे आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे 3 सदस्य प्रशांत वानखेडे, दीपक साहू सम्राट आणि प्रियांका पाटणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश मार्डीकर आणि मीनल सवई, तर एमआयएमकडून सलाउद्दीन इकरामउद्दीन आणि नजीम खान करीम खान हे प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेना आणि बसपाच्या संयुक्त गटाने मंजुषा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 6 मार्चच्या सभेत या सर्व सदस्यांमधून एकाची सभापती म्हणून निवड केली जाईल.स्थायी समितीचे पक्षनिहाय चित्रपक्ष सदस्य संख्याभारतीय जनता पक्ष 5काँग्रेस 3 युवा स्वाभिमान पक्ष 3 राष्ट्रवादी काँग्रेस2एमआयएम2सेना-बसपा गट1 .




