जिल्हा स्त्री रुग्णालय आरोग्य सेवेत राज्यात अव्वल

वंदनीय बाळासाहेब ठाकरे पुरस्कार जाहीर

* सुपर स्पेशालिटी रुग्णालयालाही मिळणार पुरस्कार

अमरावती/22 फेब्रुवारी – शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाने (डफरीन) संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावून ’वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्कारा’वर आपले नाव कोरले आहे. महिलांना देण्यात येणार्‍या आरोग्य सेवांमध्ये अमरावतीच्या या रुग्णालयाने मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांनाही मागे टाकले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने 18 फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून या निकालावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. या यशात आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाला म्हणजेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला सुद्धा त्यांच्या दमदार कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व महिला रुग्णालयांच्या तपासणीत अमरावती डफरीन रुग्णालयाला 21.2 एवढे तगडे गुण मिळाले आहेत. हा निकाल एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या काळातील रुग्णालयांच्या कामाचा लेखाजोखा मांडणार्‍या संगणकीय प्रणालीतील अहवाला वरून लावण्यात आला आहे. दवाखान्यात येणारे रुग्ण, भरती होणारे रुग्ण, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया, नैसर्गिक बाळंतपण आणि सिझेरियन ऑपरेशन्स या सर्व बाबतीत डफरीनच्या डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी जीवाचे रान करून काम केले आहे. विशेष म्हणजे रुग्णांची माहिती वेळेवर आणि अचूक भरण्यातही हे रुग्णालय आघाडीवर राहिले. जिल्ह्याचे शल्यचिकित्सक आणि आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील संपूर्ण कर्मचार्‍यांनी जो एकजुटीने प्रयत्न केला, त्याचेच हे फळ आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी एका विशेष सोहळ्यात अमरावतीच्या या शिलेदारांचा गौरव केला जाणार आहे. यामुळे आता अमरावतीकरांना दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नसून, आपले रुग्णालय राज्यात सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.

आरोग्य सेवेचा असा लागला निकाल

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने 21.2 गुणांसह बाजी मारली आहे. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक प्रसूती, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि रुग्णांना मिळणारी तात्काळ सेवा या मुद्द्यांवर डफरीन राज्याच्या नकाशावर चमकले आहे. डिजिटल कामातील अचूकता आणि रुग्णसेवेतील तत्परता यामुळेच हा ऐतिहासिक बहुमान जिल्ह्याला मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button