मनपात स्थायी समितीच्या 16 शिलेदारांची वर्णी
सभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग

अमरावती /20 फेब्रुवारी : स्थानिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाच्या पहिल्याच आमसभेत आज सत्तेची पहिली पायरी मानल्या जाणार्या 16 सदस्यीय स्थायी समितीचे गठन सर्वसंमतीने करण्यात आले. शुक्रवारी पार पडलेल्या या ऐतिहासिक सभेत भारतीय जनता पक्षाने आपल्या संख्याबळाच्या जोरावर सर्वाधिक 5 सदस्यांसह समितीवर वर्चस्व मिळवले असून, काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाचे प्रत्येकी 3 सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमला प्रत्येकी 2, तर शिवसेना-बहुजन समाज पक्ष युतीला 1 जागा मिळाली आहे. या निवडीसोबतच आता शहराच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, यावरून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर आज शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी पहिलीच मोठी आमसभा पार पडली. या सभेमध्ये पक्षीय बलाबल आणि नियमांनुसार 8 स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासोबतच सर्वात शक्तिशाली मानल्या जाणार्या 16 सदस्यीय स्थायी समितीच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 25 नगरसेवक असल्याने त्यांच्या वाट्याला 5 जागा आल्या. यामध्ये पक्षाने पद्मजा कौंडण्य, स्मिता सूर्यवंशी, मिलिंद बांबल, पंचफुला चव्हाण आणि विनोद तानवैस या अनुभवी चेहर्यांवर विश्वास टाकला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या कोट्यातून ललिता रतावा, अस्मा फिरोज खान आणि प्रशांत महल्ले या त्रयीला संधी दिली, तर युवा स्वाभिमान पक्षाकडून प्रशांत वानखडे, दीपक साहू सम्राट आणि प्रियंका पाटणे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अविनाश मार्डीकर आणि मिनल सवई या दोन सदस्यांना समितीमध्ये पाठवले आहे. एमआयएम पक्षाकडून सलाउद्दीन इकरामुद्दीन आणि नजीम खान करीम खान यांची वर्णी लागली आहे. या गदारोळात शिवसेनेच्या दोन्ही गटांसह बहुजन समाज पक्षाच्या संयुक्त गटाला एक जागा मिळाली असून, या गटाकडून शिवसेना नगरसेविका मंजुषा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या सर्व 16 सदस्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आता सर्वांच्या नजरा आगामी पहिल्या बैठकीकडे लागल्या असून, तिथेच स्थायी समितीच्या सभापतीची निवड होणार आहे. या निवडीमुळे शहराच्या विकासकामांना गती मिळणार असली तरी सभापती पदाच्या खुर्चीसाठी पडद्यामागे जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
पक्ष निवड झालेले सदस्य
भारतीय जनता पक्ष पद्मजा कौंडण्य, स्मिता सूर्यवंशी, मिलिंद बांबल, पंचफुला चव्हाण, विनोद तानवैस
काँग्रेस ललिता रतावा, अस्मा फिरोज खान, प्रशांत महल्ले
युवा स्वाभिमान प्रशांत वानखडे, दीपक साहू सम्राट, प्रियंका पाटणे
राष्ट्रवादी काँग्रेस अविनाश मार्डीकर, मिनल सवई
एमआयएम सलाउद्दीन इकरामुद्दीन, नजीम खान करीम खान
सेना – बसपा गट मंजुषा जाधव




