शहरात ‘बच्चा चोर’ टोळी?

अफवा पसरवणार्‍यांवर होणार कठोर पोलीस कारवाई

नागरिकांनी कोणत्याही भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नये

अमरावती / 17 फेब्रुवारी  : शहरात सध्या ’बच्चा चोर’ टोळी सक्रिय असल्याची आणि मुले गायब होत असल्याची जी चर्चा सुरू आहे, ती पूर्णपणे खोटी असून अशा कोणत्याही टोळीचा अस्तित्व शहरात नाही, असा स्पष्ट खुलासा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केला आहे. केवळ सोशल मीडियावरील चुकीच्या ऑडिओ क्लिप आणि अफवांनी नागरिकां मध्ये भीतीचे वाता वरण निर्माण झाले असून, अशा अफवा पसरवणार्‍या समाजकंटकांविरुद्ध पोलीस आता कडक पाऊले उचलणार आहेत. नागरिकांनी कायद्याला हातात न घेता कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास थेट 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी आल्याच्या वावड्या उठल्या आहेत. या अफवांना तेव्हा जास्त बळ मिळाले जेव्हा कॅम्प परिसराचा उल्लेख असलेली एक स्त्रीच्या आवाजातील 3 मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये मुलाचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, ही क्लिप अमरावतीची नसून ती पुण्यावरून व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.
याच अफवेचा फटका एका निष्पाप तरुणाला बसला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी ग्राऊंड परिसरात एका अनोळखी तरुणाला लोकांनी ’बच्चा चोर’ समजून बेदम मारहाण केली. चौकशीअंती तो तरुण बैतूलचा रहिवासी असून कामासाठी अमरावतीत आला असल्याचे स्पष्ट झाले. उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, अफवेपोटी एखाद्या निरपराध व्यक्तीला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिक अशा भूलथापांना बळी पडू नयेत. पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून अफवा पसरवणार्‍या प्रत्येक हालचालीवर सायबर सेलच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जात आहे. विनाकारण भीती पसरवणे किंवा कायदा हातात घेणे महागात पडू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सावधान! अफवा पसरवणे पडेल महागात-सोशल मीडियावर मुलांच्या अपहरणाबाबतचे खोटे मेसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवणे आता गुन्हेगारी स्वरूपाचे ठरेल. डिप्टी ग्राऊंड सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. संशय आल्यास स्वतः न्याय न करता तत्काळ पोलिसांना वर्दी द्यावी.

संबंधित बातम्या

Back to top button