सराफा व्यापार्‍याची लूट; घरभेद्याचे कारस्थान

सोन्याच्या पिशवीवर डल्ला मारणारी सात जणांची टोळी जेरबंद

दोन प्रयत्नानंतर 13 फेब्रुवारीची ती रात्र ठरली काळरात्र

अमरावती / 17 फेब्रुवारी : शहरातील कठोरा रस्ता परिसरात 13 फेब्रुवारीच्या रात्री एका नामांकित सराफा व्यापार्‍याला लुटल्याची खळबळजनक घटना घडली असून, या ’हाय-प्रोफाइल’ लुटीचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. महिनाभरापासून शिजणारा कट, अयशस्वी ठरलेली पहिली खेळी आणि दुकानातच घुटमळणार्‍या ’घरभेदी’ सूत्राने दिलेला दगा, अशा फिल्मी थराराने अमरावती हादरली आहे. गुन्हे शाखा आणि गाडगे नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सात सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, 1 लाख 70 हजारांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांचा ’कच्चा चिठ्ठा’च उघड केला आहे.
अमरावतीच्या बालाजी नगर येथील रहिवासी आणि सराफा व्यावसायिक सुशांत शेरेकर हे नेहमीप्रमाणे आपले दुकान आटोपून घराकडे निघाले असताना, दबा धरून बसलेल्या शिकार्‍यांनी त्यांच्यावर झडप घातली. या गुन्ह्याचा तपास करताना खुद्द पोलीसही चक्रावून गेले. या संपूर्ण लुटीचा ’मास्टरमाइंड’ दुसरा तिसरा कोणी नसून, शेरेकर यांच्या दुकानात नेहमी येणारा बंटी खंडारे हाच निघाला. बंटीनेच चोरांना शेरेकर यांची प्रत्येक हालचाल, त्यांच्या पिशवीतील मुद्देमाल आणि घराकडे जाण्याचा नेमका मार्ग याची खडान्खडा माहिती पुरवली होती. या टोळीने आपला मुख्य अड्डा सुशांत शेरेकर यांच्या दुकानासमोरील ’मां भगवती पानठेल्या’ला बनवले होते. दिवसातून दोन-तीन वेळा तिथे जमायचे, सिगारेट ओढायची आणि व्यापार्‍याच्या प्रत्येक हालचालीवर ’रेकी’ करायची, असा यांचा नित्यक्रम होता. 15 जानेवारीला या सर्वांनी पहिली बैठक घेऊन 7 फेब्रुवारीला लुटीचा बेत आखला होता. मात्र, त्या दिवशी रस्त्यावर लोकांची वर्दळ जास्त असल्याने त्यांचा डाव फसला. पण हार न मानता 13 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजता त्यांनी शेरेकर यांना गाठलेच.
या कारवाईत पोलिसांनी फिरोज खान कासम खान, सैयद इरफान उर्फ दबंग, शेख रिजवान, शेख इमरान आणि मुख्य सूत्रधार बंटी खंडारे यांच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार जणांवर बडनेरा, नागपुरी गेट, नांदगाव पेठ, राजापेठ, गाडगे नगर आणि तिवसा अशा पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे आधीच नोंद आहेत. लूट सुरू असताना बंटी खंडारे हा स्वतः लांब उभा राहून ’पोलीस’ किंवा इतर कोणाची चाहूल तर लागत नाही ना, यावर लक्ष ठेवून होता. पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांची पूर्ण ’कुंडली’ बाहेर काढली असून विदर्भातील या मोठ्या गुन्ह्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे.

सिगारेटच्या धुराआड शिजला ‘कट’

व्यापार्‍याच्या विश्वासातील बंटी खंडारेनेच घात केल्याचे उघड झाले आहे. दुकानासमोरील पानठेल्यावर तासनतास बसून या टोळीने रेकी केली. बंटीने दिलेल्या टिपवरूनच कोणत्या गल्लीतून व्यापारी घरी जातो, हे ठरवून हा नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला. अखेर खाकीच्या कचाट्यात ही टोळी सापडली आणि त्यांचा ’गेम’ फसला.

संबंधित बातम्या

Back to top button