वि.सा.संघाच्या निवडणुकीची सोशल मीडियावर धूम

नागपूर /12 फेब्रुवारी : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या चार निवडणुकीत उमेदवारांनी त्यांचे पॅनेल निश्चित केले असून ही निवडणूक आता गटागटांतील चुरस वाढविणारी ठरणार आहे. गिरीश गांधी यांनी 22 सदस्यांचे पॅनेल जाहीर केल्यानंतर रवींद्र शोभणे यांनीही त्यांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. मात्र, शोभणेंच्या पॅनेलमध्ये आठच सदस्य असल्याने साडेतीन पॅनेल मैदानात उतरल्याची चर्चा आहे.
अध्यक्ष म्हणून गिरीश गांधींच्या पॅनेलमध्ये अरुणा सबाने, अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणारे लखनसिंह कटरे, विष्णू मनोहर, शुभदा फडणवीस, बाळ कुळकर्णी, संदीप बारस्कर, प्रा. डॉ. शोभा रोकडे, विजय कर्णेवार, इरफान शेख, शंकरराव शंखपाळे, डॉ. जया कुळकर्णी, अजेय गंपावार, अमर कुळकर्णी, डॉ. देवेंद्र पुणसे, आसावरी तिडके, अनिल इंदाने, डॉ. पराग घोंगे, माधुरी साकुळकर, स्वाती मोहरील, चंद्रकांत लाखे, विवेक कवठेकर, श्याम धोंड यांचा समावेश आहे. प्रदीप दाते, श्रीपाद जोशी यांच्यानंतर गिरीश गांधी व डॉ. रवींद्र शोभणे यांचेही पॅनेल जाहीर झाले आहे. केवळ नाट्यकर्मी रंजन दारव्हेकर यांच्या पॅनेलची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर रणधुमाळी-निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी नागपूरमधील सभासदांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, प्रचाराचा जोर सोशल मीडियावर अधिक दिसून येत आहे. प्रत्येक उमेदवार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सभासदांपर्यंत आपली भूमिका मांडत आहेत. सर्व पॅनल सदस्यांच्या नावासह वि. सा. संघासाठी काय करणार, याबाबत अजेंडा सांगितला जात आहे.
रवींद्र शोभणेंनी जाहीर केले पॅनेल
2026-31 या कालावधीसाठी विदर्भसाहित्य संघाच्या निवडणुकीत ॉ. रवींद्र शोभणे हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनेल घेऊन उतरले आहेत. त्यांच्या पॅनेलमध्ये सदस्यपदासाठी संजय भाकरे, विजया मारोतकर, डॉ. बळवंत भोयर, संजय तिजारे, श्रीकांत गोडबोले, प्राचार्य अजय अंबादास देशपांडे, डॉ. विशाखा कांबळे, श्रीकांत पवनीकर यांच्या नावाचा समावेश आहे.




