आरोग्य शिबिरात महिलेचा मृत्यू, चिखलदर्‍याची घटना

अमरावती/6 फेब्रुवारी  : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिकलसेल या जीवघेण्या आजाराने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले असून, आरोग्य विभागाच्या शिबिरातच एका 42 वर्षीय महिलेचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. चिखली गावातील रहिवासी असलेल्या द्रोपदी सुरेश पटोलकर या गेल्या पाच वर्षांपासून सिकलसेलवर उपचार घेत होत्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि दिव्यांग प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण व्हावी, या उद्देशाने आशा स्वयंसेविका जया खेडकर आणि गावातील नागरिकांसह त्या चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयातील शिबिरात पोहोचल्या होत्या. मात्र, रुग्णालय परिसरात पाऊल ठेवताच त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या आणि क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य शिबिरात एकच खळबळ उडाली असून मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या चिखलदरा तालुक्यात 209 रुग्ण प्रत्यक्ष या आजाराने ग्रस्त असून, 3088 नागरिक या आजाराचे वाहक असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
मृत्यूचा विळखा आणि भयावह आकडेवारी-मेळघाटात सिकलसेलचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. एकट्या चिखलदरा तालुक्यात 3088 नागरिक या आजाराचे वाहक असून 209 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. द्रोपदी पटोलकर यांचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा असून, दुर्गम भागातील या रुग्णांना अधिक सक्षम आरोग्य सुविधांची आणि तातडीच्या उपचारांची नितांत गरज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button