98 विद्यापीठांचा सहभाग; पाच दिवस रंगणार सामने
अमरावतीमध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

देशपातळीवर भव्य आयोजन
अमरावती /6 फेब्रुवारी – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला)स्पर्धा 2025-26’ चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सॉफ्टबॉलच्या इतिहासात प्रथमच महिला आणि पुरुष अशा दोन्हीगटांच्या राष्ट्रीय स्पर्धा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित करून अमरावतीने एक नवा इतिहास रचला आहे.
आज झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगाले, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव डॉ. सुरजसिंह येवतीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनीषा कोडापे, डॉ. श्वेता बारहाते, डॉ. सौ स्वाती ढोरे, सौ. निर्मलाताई हर्षवर्धन देशमुख, सौ प्रेरणाताई दिलीपबाबू इंगोले, सौ मीनाताई विजय ठाकरे, शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. तनुजा राऊत, सदस्य प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. सतीश पहाडे, डॉ. विकास टोणे, प्राचार्य डॉ. जी व्ही कोरपे, डॉ. रूपाली इंगोले, ए. आय. यु. चे निरीक्षक श्री दिलीप तूरकी, स्पर्धेचे मुख्य परीक्षक श्री मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून खेळाडूंना संबोधित करताना जिल्हाधिकारी येरेकर यांनी अमरावतीच्या पावन भूमीत सर्व खेळाडूंचे स्वागत केले. ते म्हणाले की, अमरावती ही अंबादेवी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांची भूमी आहे. या भूमीने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगीतले की, भारतातील विविध राज्यांतून आलेल्या खेळाडूंमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळ हे सर्व प्रांतांना एकत्र जोडण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. केवळ शिस्तबद्ध व्यक्तीच आयुष्यात खर्या अर्थाने प्रगती करू शकतो. खेळांमुळे आयुष्यात शिस्त येते. संघभावना आणि स्वतःवरचा विश्वास या गोष्टी खेळामुळे शिकायला मिळतात, ज्यामुळे खेळाडूच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. पुढील चार दिवस चालणार्या या स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकार्यांनी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी देशपातळीवर उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा व्यक्त केली. अमरावती ही रुक्मिणीची नगरी आणि चिखलदरा हे भीमाचे स्थान (जिथे कीचक वध झाला) असल्याचे सांगून त्यांनी देशभरातून आलेल्या खेळाडूंचे पौराणिक संदर्भासह स्वागत केले. नुकत्याच झालेल्या मुलांच्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या असून, आता 6 ते 10 तारखेपर्यंत मुलींच्या स्पर्धा चालणार आहेत. हार-जीत पेक्षा एकता आणि खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिरंगा असलेली फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आली. स्मृतीचिन्ह व पुष्प देऊनपाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.व्ही. कोरपे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तनुजा राऊत यांनी, संचालन डॉ. रेखा मग्गीरवार व डॉ. मुकुंद भोंडे यांनी केले, तर आभार डॉ. रूपाली इंगोले यांनी मानले. डॉ. अवंतिका मानकर यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. उद्घाटनकार्यक्रमाला देशभरातील सर्व विद्यापीठांचे सहभागी खेळाडू, विद्यापीठ व शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविधप्राधिकारणींचे सन्माननीय सदस्य, शिक्षक अधिकारी,कर्मचारी, तसेच गणमान्य नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. अमरावतीकर नागरिकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.




