अजित दादांच्या निधनाने जिल्हा शोक सागरात
विमान अपघातात उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू

अमरावती /28 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी सकाळी कार्यालये सुरू होत असतानाच पुण्यातून आलेल्या या हृदयद्रावक बातमीने प्रशासकीय यंत्रणेसह जनजीवन स्तब्ध झाले. राज्य सरकारने तातडीने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने शासकीय परिपत्रक काढून सुट्टीची अंमलबजावणी केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने शोकसभा आयोजित करून अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, बबलू शेखावत, बबलू देशमुख, डॉ. सुनील देशमुख, भैया पवार, रामेश्वर अभ्यंकर, वैभव वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या बैठका आणि सर्व शासकीय सोहळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. आपल्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी अमरावतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीकडे रवाना झाले आहेत. जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, सुरेखाताई ठाकरे, डॉ. गणेश खारकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ताफा विविध वाहनांनी मार्गस्थ झाला, तर आमदार संजय खोडके मुंबईवरून थेट बारामतीला पोहोचले आहेत.
बारामतीकडे जनसागराचा ओघ-आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी भावूक झाले आहेत. खासगी वाहने, बसेस आणि रेल्वेने हजारो समर्थक बारामतीकडे निघाले आहेत. अजितदादांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.




