दोन किन्नर गटांत खुलेआम तलवार बाजी
आशीयाड कॉलनीत परिसरात चाकू हल्ला, 3 जखमी

* संतापलेल्या किन्नरांनी राजकमल चौकात केला रस्ता रोखो
अमरावती /27 जानेवारी : शहरात मंगळवारच्या सकाळी वर्चस्वाच्या वादातून दोन गटांमध्ये रक्ताचा सडा पडला. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे शेगाव नाका परिसरातील आशियाड कॉलनी अक्षरशः हादरून गेली आहे. भररस्त्यात तलवारी आणि चाकूने करण्यात आलेल्या या जीवघेण्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेनंतर संपूर्ण शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद पोलीस ठाण्यावर उमटले असून जखमींच्या समर्थकांनी तिथे मोठा ठिय्या मांडला होता. मिळालेली अधिक माहिती अशी की, मधु सनातन कर्मकार (वय 24, रा. निंभोरा), रितू विनोद सरकटे (वय 27, रा. राजापेठ) आणि किंजल पाटील (वय 30, रा. राजापेठ) हे तिघे आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास आशियाड कॉलनी भागातून आपल्या कामासाठी जात होते. यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या दुसर्या गटाच्या टोळीने त्यांना अचानक घेरले. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी एकमेकांना चिडवणे आणि शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, काही क्षणातच या वादाने हिंसक वळण घेतले. विरोधी गटातील तरुणांनी आपल्याकडे असलेल्या तलवारी आणि चाकू काढून या तिघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात सुरू असलेला हा रक्ताचा खेळ पाहून आजूबाजूच्या नागरिकांची भंबेरी उडाली. या हल्ल्यात मधु, रितू आणि किंजल हे तिघेही गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची माहिती वार्यासारखी शहरात पसरताच आम्रपाली गटाच्या शेकडो समर्थकांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यावर धडक दिली.पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या या जमावाने जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल यावेळी समर्थकांनी उपस्थित केला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गाडगे नगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे अमरावतीमधील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील अंतर्गत वाद सातत्याने समोर येत आहेत. मात्र, आजच्या घटनेत ज्या पद्धतीने शस्त्रांचा वापर करण्यात आला, त्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर जर नागरिक सुरक्षित नसतील, तर प्रशासनाचा वचक कुठे आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य अमरावतीकर विचारत आहेत. या गुंडगिरीचा कायमचा बंदोबस्त करणे ही आता पोलिसांसमोर मोठी आव्हान ठरणार आहे.




