श्री संत गोरोबा काका समाजोन्नती समितीच्या अध्यक्षपदी प्रा.सुरेशराव नांदुरकर

अमरावती /20 जानेवारी : शिक्षण आणि उद्योगाचा भक्कम पाया रचून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची गंगा पोहोचवण्याचा संकल्प सोडत, श्री संत गोरोबा काका समाजोन्नती बहुउद्देशीय समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सुरेशराव नांदुरकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अमरावती येथील गोरोबा भवनमध्ये पार पडलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीने समाजकार्याला नवी दिशा दिली असून, आगामी पाच वर्षांत युवा पिढीच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.अमरावती येथील या महत्त्वपूर्ण आमसभेचे अध्यक्षपद समाजरत्न पंजाबराव काकडे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकरराव शेंडोकार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नांदुरकर यांनी अत्यंत पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण केली. नवनियुक्त मंडळात कार्याध्यक्षपदी संतोषराव सरोदे, उपाध्यक्षपदी दिलीपराव खांडेकर व के. एन. मोरे, तर सचिव म्हणून डॉ. श्रीरामजी कोल्हे यांची निवड झाली आहे. तिजोरीची जबाबदारी सतीशराव गावंडे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, सुरेंद्रजी सरोदे व रामेश्वरराव वडुरकर सहपदांवर कार्यरत राहतील. कार्यकारी मंडळात संजयजी गंधरवार, रमेशराव तांबट, विनोदजी काकडे, देविदासराव खोपे, प्रफुल्लजी खोपे, राजेंद्रजी मांगुळकर, अरुणराव पोहनकर, डॉ. दीपकराव साळिवकर आणि वनमालाताई जवळेकर यांचा समावेश आहे. कायदेशीर मार्गदर्शनासाठी एड. गजाननराव तांबट, जनसंपर्कासाठी पंडितराव जवळेकर तर मार्गदर्शक म्हणून मारोतराव शेंडोकार व पंजाबराव काकडे समाजाचे रक्षण करतील.




