कापूस उत्पादक शेतकर्यांच्या विकासाला यंत्राची जोड
वस्त्र मंत्रालय आणि सीसीआयचा शेतकर्यांसाठी पुढाकार

* आधुनिक कापणी यंत्रांमुळे उत्पादन खर्चात बचत
अमरावती /20 जानेवारी : जिल्ह्यातील नांदगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 18 जानेवारी 2026 रोजी भारतीय कापूस निगमच्या वतीने एक विशेष सोहळा पार पडला. कापूस उत्पादक शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने, महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत कापणी यंत्रांचे वाटप करण्यात आले. कारंजा लाड येथील ’वंदे भारत’ आणि अंजनगाव सुर्जी येथील ’लोकयंत्री’ या शेतकरी उत्पादक कंपन्यांना ही यंत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे केवळ मजुरीचा खर्चच कमी होणार नाही, तर कापूस शेती अधिक फायदेशीर आणि सुलभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे विदर्भातील शेतकरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून, कृषी क्षेत्रात आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहेत. या दिमाखदार सोहळ्याला वस्त्र मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पद्मिनी सिंगला आणि भारतीय कापूस निगमचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी विदर्भातील कपाशीचे वैभव टिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अकोला शाखेचे व्यवस्थापक ब्रिजेश कसाना, बी. एन. तिवारी, हर्षदीप सपकाळ आणि केंद्र प्रमुख पंकज केवटे या अधिकार्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. या उपक्रमातून शेती हा तोट्याचा व्यवसाय न राहता तो एक आधुनिक उद्योग म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सोहळ्यानंतर मान्यवरांनी स्थानिक लकी कारखान्याला भेट देऊन प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली. यावेळी इब्राहिम भाई, वसीम भाई आणि सलीम भाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ही यंत्रे शेतीची कामे वेगाने उरकण्यास मदत करतील.




