पतंग उडवताना चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

मूर्तिजापूर येथील धक्कादायक घटना

अकोला/19 जानेवारी : शहरात पतंग उडविण्याचा आनंद लुटणार्‍या एका 10 वर्षांच्या कोवळ्या बालकाचा उघड्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेख उमेर शेख फकीर असे या चिमुकल्याचे नाव असून, ही काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. खेळता-खेळता काळाने घातलेल्या या झडपेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विदर्भातील उघड्या विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासकीय दिरंगाईचा पुरावा म्हणून समोर आला आहे.
मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती भागातील परदेशीपुरा आणि प्रजापती ले-आउट परिसरात पतंग उडविण्याचा माहोल होता. शेख उमेर हा मुलगा आपल्या मित्रांसोबत पतंगाच्या मागे धावत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो जवळच असलेल्या एका खोल उघड्या विहिरीत कोसळला. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आरडाओरडा केला, मात्र खोल पाण्यात पडल्याने उमेरचा जीव वाचू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तातडीने सक्रिय झाले. आमदार हरीष पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार आणि सुनील लछुवानी यांनी तत्काळ संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोणतीही वेळ न घालवता तीस फूट खोल विहिरीत शोधमोहीम राबविली. केवळ वीस मिनिटांत उमेरचा मृतदेह बाहेर काढण्यात या पथकाला यश आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह आशिष शिंदे, गणेश सूर्यवंशी यांनी पंचनामा करून परिस्थिती हाताळली. यावेळी अमोल प्रजापती, सचिन उगले, सद्दाम पटेल, राम नेमाडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. एका हसत्या-खेळत्या मुलाचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण शहरावर दुःखाचे सावट पसरले आहे. प्रशासनाने आतातरी उघड्या विहिरींबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर-निरागस उमेरचा बळी गेल्यानंतर उघड्या विहिरींचा धोका पुन्हा चर्चेत आला आहे. निवासी भागात किंवा खेळाच्या मैदानाजवळ अशा मृत्यूचे सापळे उघडे ठेवणार्‍या मालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ एक झाकण किंवा भिंत या कोवळ्या जीवाचा प्राण वाचवू शकली असती, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button