अमरावती भाजपमध्ये अंतर्गत संघर्षाचा महास्फोट

मर्जीतील चौकडीने पक्षाचे मोठे नुकसान केल्याचा गंभीर आरोप

* अनुभवी नेत्यांना डावलल्याने निवडणुकीत भाजपची दाणादाण

अमरावती /18 जानेवारी : शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी स्वकीयांवरच तोफ डागत खळबळ उडवून दिली आहे. पक्षातील एका विशिष्ट ‘चौकडी’ने मनमानी कारभार चालवत तिकीट वाटपात घोळ घातल्याचा आरोप करत त्यांनी थेट पक्षाच्या पराभवाचे खापर या गटावर फोडले आहे. ज्या नेत्यांना जनाधार नाही अशा तीन-चार लोकांनी संपूर्ण पक्षावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने भाजपचा विजय हुकल्याचा दावा पातुरकर यांनी केला आहे. हा वाद आता केवळ अंतर्गत राहिला नसून सार्वजनिकरीत्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.
अमरावतीच्या गल्लीबोळातील राजकारणाची आणि कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची अचूक माहिती असतानाही, अनुभवी नेत्यांना निवडणूक नियोजनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची खंत किरण पातुरकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या सुरात सूर मिसळत माजी पदाधिकारी डॉक्टर अविनाश चौधरी यांनीही सध्याच्या नेतृत्वात संवाद आणि जुन्या नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केले. 2017 च्या निवडणुकीत डॉक्टर सुनील देशमुख आणि पातुरकर यांनी गुणवत्तेच्या आधारावर तिकीट वाटप केल्याने पक्षाला 45 जागांवर यश मिळाले होते. मात्र, यावेळेस उमेदवाराची आर्थिक किंवा सामाजिक क्षमता न तपासता केवळ मर्जीतील लोकांना संधी दिल्याने पक्षाचा आकडा 25 वरच मर्यादित राहिला, असा आरोप त्यांनी केला आहे.विशेष म्हणजे, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर आणि माजी महापौर किरण महल्ले यांच्यासारख्या तब्बल चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या धुरिणांना बाजूला सारून नवीन आणि अननुभवी लोकांनी सूत्रे हाती घेतल्याने पक्षाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. ज्या 55 इच्छुकांना भाजपने नाकारले, त्यांना इतर पक्षांनी त्वरित संधी दिली, ही पक्षाची मोठी चूक ठरल्याचे पातुरकर यांनी नमूद केले. तसेच खा.नवनीत राणा यांनी आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे केलेले आवाहन रोखण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली जाणार असून आगामी काळात अमरावती भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनुभवी नेत्यांची उपेक्षा आणि पराभवाचे गणित-चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या पातुरकर, खांडेकर आणि महल्ले यांना बाजूला सारून केवळ मर्जी सांभाळण्यासाठी तिकीट वाटप झाले. त्यामुळे 50 हून अधिक जागा जिंकण्याची क्षमता असताना भाजप केवळ 25 जागांवर अडकली. पक्षाचे नुकसान करणार्‍यांची नावे लवकरच वरिष्ठांकडे उघड करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button