अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच भाजपचे मुख्य ध्येय

शहराच्या विकासासाठी कमळ फुलवा महसूलमंत्री बावनकुळे यांचे आवाहन

* भगवा ध्वज आणि रामराज्याच्या विचारांचाच महापौर शहराचे नेतृत्व करेल

अमरावती / 8 जानेवारी : मनपाच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासाचा रथ घेऊन रिंगणात उतरला असून, नागपूरच्या धर्तीवर अमरावतीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे. शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी भाजपाला कौल द्यावा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शहरातील दसरा मैदान येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विरोधकांच्या नैराश्यावर ओढलेले ताशेरे आणि शहरासाठी जाहीर केलेल्या कोट्यवधींच्या योजनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावतीचा महापौर हा ’जय श्री राम’ आणि ’भारत माता की जय’ म्हणणाराच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही हात घातला. शहरातील रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांचे जाळे आणि सांडपाणी व्यव स्थापनासाठी सरकारने विशेष आराखडा तयार केला असून, सुरक्षेसाठी प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विशेषतः महिला सक्षमी करणासाठी ’लाडकी बहीण’ योजना अखंड सुरू राहणार असून, दोन हजार महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. वाढत्या वीज दरावर उपाय म्हणून ’मुख्यमंत्री सौर वीज योजना’ राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. बेलोरा विमानतळावरून लवकरच देशातील 10 प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असून, महानगरपालिकेच्या नवीन वास्तूसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करताना सांगितले की, विकासाची खोटी आश्वासने देणार्‍या काँग्रेसची आता सर्वत्र वाताहात झाली आहे. या सभेला शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयार, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार प्रवीण तायडे, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे यांच्यासह डॉ. नितीन धांडे, प्रा. दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर, सुनील खराटे, अ‍ॅड.प्रशांत देशपांडे, मीना पाठक, रवींद्र खांडेकर आणि भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले : बावनकुळे 

काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, मागील निवडणुकीत आश्वासन देणारे काँग्रेसचे खासदार आता शोधूनही सापडत नाहीत. जनतेला ’खासदार पाहिलेत का?’ म्हणण्याची वेळ आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेताल वक्तव्यांमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. काँग्रेसकडे आता केवळ नैराश्य उरले असून जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे, असेही ते म्हणाले.

पक्षाशी प्रतारणा करणार्‍यांना माफी नाही : नवनीत राणा

भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी यावेळी पक्षांतर्गत विरोधकांना कडक इशारा दिला. तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असल्या तरी राज्याचे नेतृत्व आमचेच मुख्यमंत्री करत आहेत, त्यामुळे निधीची चिंता करू नका, असे त्या म्हणाल्या. भाजपचा दुपट्टा गळ्यात घालून कमळाच्या चिन्हाशी गद्दारी करणार्‍यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक तुषार भारतीय यांची उपस्थिती आणि राणा यांचा इशारा यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button