कोणीही एकत्र आले तरी 51 टक्के मतं भाजपची
मनपा निवडणुकीवर महसूल मंत्री बावनकुळे यांचा विश्वास

ठाकरे बंधुच्या युतीवर निशाणा
अकोला/20 डिसेंबर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महसूल मंत्री आणि प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात दाखल झाले. पक्षाच्या पदाधिकार्यांसह आढावा बैठक घेताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, कोणीही विरोधक एकत्र आले तरी भाजप 51 टक्के मतांसह विजय मिळवणार आहे.
बावनकुळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत 20 पक्ष एकत्र आले, तरी आम्हाला हरवू शकले नाहीत. आता ठाकरे बंधू एकत्र येऊन काय बदल घडवून आणणार? मतदार आमच्या बाजूने आहेत. कोणताही मोठा गट एकत्र येऊन निवडणुकीत यश मिळवू शकत नाही. त्यांनी विरोधकांवर थेट टीका करताना याबाबतही निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत काही फटका बसला, पण विधानसभेत संघटनात्मक तयारी व सरकार पातळीवरील कामामुळे आम्हाला यश मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही चांगले काम करत असल्यामुळे जनता आमच्या सोबत आहे. डबल इंजिन सरकारला जनतेची पूर्ण पसंती आहे आणि हेच सरकार विकासासाठी सक्षम आहेत. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहे. प्रत्येक महापालिकेसाठी पाच जणांच्या टीमवर जबाबदारी ठेवण्यात आली असून, शिवसेनेसोबत योग्य पद्धतीने महायुती होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीसोबत चर्चा होणार आहेत, त्या ठिकाणीही आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाईल.अकोला महापालिकेत भाजपातील काही नाराज गट तिसर्या आघाडीच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहेत. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, नाराज गटाशी चर्चा करून मतभेद आणि मनभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, जेणेकरून पक्ष एकत्र राहून यश मिळवू शकेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपची भूमिका अधोरेखित केली. कोणताही विरोधक गट एकत्र येऊन फरक पडणार नाही. जनता ज्या पक्षाच्या बाजूने आहे, तोच विजय मिळवतो. विधानसभा आणि स्थानिक पातळीवर आमच्या संघटनात्मक तयारीमुळे भाजप कायम यशस्वी राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.भाजपच्या या स्पष्ट घोषणा आणि महापालिका निवडणुकीत आत्मविश्वास दाखवणार्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाच्या रणनितीक हालचालींवर लक्ष केंद्रीत झाले आहे.




