एफएसटी, व्हीएसटी व एसएसटीच्या रचना व भूमिकांवर सविस्तर प्रशिक्षण
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

अमरावती /18 डिसेंबर : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम), व्हीएसटी (व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम) आणि एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) यांच्या रचना, कार्यपद्धती व जबाबदार्यांबाबत सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडला. या प्रशिक्षण सत्रात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यावर विशेष भर देण्यात आला. एफएसटीमार्फत निवडणूक कालावधीत प्राप्त होणार्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन घटनास्थळी भेट देणे, तपासणी करून आवश्यक ती कारवाई करणे, तसेच त्याबाबतचा अहवाल वेळेत सादर करण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन आचारसंहिता कक्ष प्रमुख राम लंके यांनी केले. व्हीएसटी (व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम) बाबत बोलताना निवडणूक प्रचार, सभा, मिरवणुका व अन्य हालचालींचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचे दस्तऐवजीकरण करणे, पुराव्याच्या स्वरूपात व्हिडिओ सामग्री सुरक्षित ठेवणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित अधिकार्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) मार्फत ठराविक ठिकाणी स्थिरपणे कार्यरत राहून संशयास्पद हालचाली, रोख रक्कम, भेटवस्तू अथवा बेकायदेशीर प्रचार साहित्य यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आचारसंहिता कक्ष प्रमुख राम लंके यांनी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी समन्वयाने, जबाबदारीने आणि निःपक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन केले. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन, वेळेवर अहवाल सादरीकरण आणि नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम राहील, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 सुरळीत, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी एफएसटी, व्हीएसटी व एसएसटी निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व विविध पथकांचे सदस्य उपस्थित होते.




