कृषी योजनांच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

* विविध योजनांचा निधी प्रलंबित असल्याने सभागृहात खडाजंगी

नागपूर /11 डिसेंबर : राज्य शासन शेतकर्‍यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी (11 डिसेंबर) विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, सदाभाऊ खोत, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, संजय खोडके आणि कृपाल तुमाने यांनी सहभाग घेतला.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी संकटात असताना शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यापुढे शेतकर्‍याच्या हितासाठी शासन खंबीरपणे उभे राहील. मार्चपर्यंत कृषी योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जांच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच लाभार्थ्यांची खात्री करून योजनेच्या निकषानुसार पात्र व्यक्तींना लाभ देण्यात येतो. कृषी विभागांतर्गत विविध योजनाअंतर्गत निधीची आवश्यकता आहे. याकरिता कृषी समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. सन 2025-26 वर्षाकरिता कृषी विभागामार्फत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी 82 कोटी 67 लाख, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणसाठी 200 कोटी, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी (पीडीएमसी) 251 कोटी 41 लाख 50 हजार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 100 कोटी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 62 कोटी 70 लाख, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेसाठी 31 कोटी 97 लाख 75 हजार आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी 68 कोटी 33 लाख 33 हजार इतका निधी वितरित करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button