माजी मंत्री भारत बोन्द्रे कालवश
महाराष्ट्राचा ‘जलपुरूष’ हरपला

चिखली येथे वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बुलढाणा /3 डिसेंबर : महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सभ्य, अभ्यासू राजकारणाच्या उज्ज्वल परंपरेतील एक राजकीय नेता, जिल्ह्याच्या राजकारणातील अजातशत्रू आणि विकासाभिमुख एक आदर्श राजकीय व्यक्तिमत्वाचे धनी, चिखली मतदारसंघावर अधिराज्य गाजवीणारे आमदार,राज्याचे माजी मंत्री आणि शरदचंद्र पवार यांचे निष्ठावान सहकारी भारत राजाभाऊ बोन्द्रे यांचे आज 3 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.बुलढाणा जिल्ह्याचे जल पुरुष अशी ख्याती असलेला हा अष्टपैलू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पश्चात बोन्द्रे परिवारासह, त्यांच्यावर आजीवन प्रेम करणारे चाहते आणि सिंचन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना अखेरपर्यंत प्रेम करणारे व त्यांचे मार्गदर्शन घेणारे सिंचन विभागातील शेकडो अधिकारी कर्मचारी आहेत. याशिवाय त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकारलेले जिगाव, खडकपूर्णा सिंचन प्रकल्प, त्यांनी तयार केलेले सिंचनाचे जाळे, यातून त्यांना मिळालेली जल पुरुष ही उपाधी या आठवणी शेष आहे.साधी राहणी, उच्च विचारसरणी या तत्वाने हयातभर सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे भारत बोन्द्रे यांना सार्वजनिक क्षेत्राची उपजतच होती. राजकारणाचे बालकडू त्यांना घरातून या आवडीतून मिळाले. जिल्ह्याची राजकीय राजधानी असा सत्तरीच्या दशकात चिखली चा लौकिक होता. चिखली मतदारसंघात तेंव्हा टी. बी. खेडेकर व संतोष पाटील या बहुजन नेत्यांचा दबदबा होता. या प्रस्थापित नेत्यांचे आव्हान पेलून भारत बोन्द्रे या काँग्रेसी नेत्याने राजकारणात आपले पाऊल टाकले. संघाचा प्रभाव असलेल्या चिखली मध्ये त्यांनी काँग्रेसची सर्वधर्म साम भाव ची विचारधारा आणि काँग्रेसचा तिरंगा फडकवीत ठेवला.




