विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन
वयाच्या 90 व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास

* राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा
नागपूर 22 मार्च – विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे आज रविवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे सागर मेघे व आमदार समीर मेघे ही दोन मुले, सुना. नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला. गेले 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच खामला पांडे लेआऊट येथील निवासस्थानी सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी, चाहत्यांनी गर्दी केली. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमध्ये केली. त्यांनी वर्धा,रामटेक, नागपूर लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. ते 3 वेळा विधान परिषद सदस्य,मंत्रीही होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोद सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (1996 व वर्धा (1998) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
आज अंत्यविधी
आज सोमवार 23 मार्च 2026 रोजी, दुपारी 1.00 वाजेपर्यंत श्री. दत्ताजी मेघे यांचे पार्थिव दर्शनासाठी 135, पांडे ले-आऊट, खामला, नागपूर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव वर्धा येथे नेण्यात येईल. सावंगी (मेघे) येथील निवासस्थानी दुपारी 2.30 ते 4.00 वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पवनार ते सेवाग्राम रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.




