किरकोळ वादातून हैदरपुरात तिघांवर चाकू हल्ला

रुग्णालयात डॉक्टरांच्या उशिरामुळे तणाव

अमरावती / 7 नोव्हेंबर – खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या हैदरपुरा परिसरात गुरुवारी (6 नोव्हेंबर) रात्री किरकोळ वादातून तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. रात्री 9.30 वाजता झालेल्या या हल्ल्यात शाहीन परवीन रफिक शहा (35), शेख अहेफाज उर्फ पप्पू शेख शफी (21) आणि शेख आबिद शेख हाफिज (25) गंभीर जखमी झाले. सलग चाकू वारांमुळे परिसरात घबराट उडाली.जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. जखमींपैकी शेख अहेफाज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांच्या उशिरामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. रात्री 10.30 वाजता बोलावण्यात आलेली महिला सर्जन तब्बल एक ते दीड तास उशिरा पोहोचल्याने जखमींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी दर्यापूर येथील एका दुसर्‍या जखमी रुग्णाच्या उपचारावरूनही कुटुंबीय आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण होऊन वातावरण तणावपूर्ण झाले.या प्रकरणानंतर जखमींच्या नातेवाईकांनी महिला सर्जनविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली.दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्ल्याचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनाक्रमामुळे हैदरपुरा परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Back to top button