शिक्षकांच्या सुटीवर प्रशिक्षणाचे ओझ
इयत्ता दोन ते चारच्या गुरुजींची सुटी संपली

उन्हाळ्यात शिक्षकांना आता नवे धडे मिळणार
अमरावती/12 एप्रिल;– राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या हक्काच्या उन्हाळी सुटीवर यंदा प्रशिक्षणाचे मोठे संकट आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार्या सुधारित अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांना मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. आधीच जनगणना आणि मतदार नोंदणीच्या कामात जुंपलेल्या शिक्षकांसाठी आता हे प्रशिक्षण म्हणजे ’धरणे ना सोडणे’ अशी अवस्था झाली आहे.
येत्या 15 जून 2026 पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने त्यापूर्वी शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम समजावून सांगणे गरजेचे आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी तीन दिवस, तर तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी चार दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. यामध्ये राज्यस्तरावरील प्रशिक्षण 4 ते 7 मे, जिल्हास्तरावर 11 ते 14 मे आणि तालुकास्तरावर 18 ते 30 मे या दरम्यान वर्गांचे आयोजन केले जाणार आहे. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी हे स्वतंत्र वर्ग असतील, तर इतर माध्यमांच्या शिक्षकांना मराठी तुकडीत सामावून घेतले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (डाएट) संपूर्ण जबाबदारी देण्यात आली असून 60 प्रशिक्षणार्थींची एक तुकडी याप्रमाणे नियोजन केले आहे. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी येताना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रती सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, विद्या प्राधिकरणाच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षणाबाबतच्या सर्व सूचना निर्गमित केल्या असून शिक्षकांनी या प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.




