शिक्षक मतदारांना पैठणी अन् 2 हजाराची पाकिटे
अमरावती शिक्षक मतदारसंघात खळबळ!

आ. किरण सरनाईक यांचा पैठणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
शिवकृपा हायस्कूलच्या शिक्षकांनी आ. सरनाईकांना दाखवला स्वाभिमान!
रोख रक्कम वृद्धाश्रमाला देऊन अधिकृत पावती घेतली
अमरावती/22 सप्टेंबर– शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण भलतेच तापले असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा उघडउघड वापर सुरू झाला आहे. विद्यमान आमदार अॅड. किरण सरनाईक यांच्या भावाने आणि चिरंजीवाने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील नामांकित व प्रतिष्ठित शाळांमध्ये भेटी देऊन शिक्षक मतदारांना ’पैठणी’ आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांचे ’नगदी पाकीट’ वाटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
अत्यंत किरकोळ अपवाद वगळता शहरातील बहुतांश प्रतिष्ठित शाळांमधील गुरूजी आणि महिलाकार्यकर्त्यांनी शाळेत शिक्षकांसाठी कौटुंबिक भेट म्हणून पैठणी आणि रोख 2 हजार रुपये देण्याचा प्रयत्न केल्याचे शाळेचे म्हणणे आहे. शिक्षकांनी ही भेट स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर शाळेने न स्वीकारलेल्या वस्तू जेवड नगर येथील सुख शांती वृद्धाश्रमातील गरजू भगिनींना देण्याचा निर्णय घेतला. रोख रक्कमही वृद्धाश्रमाकडे जमा करून त्याची पावती घेण्यात आली. या प्रकारामुळे शिक्षकांच्या स्वाभिमानाचा आणि निवडणुकीच्या काळात मतदारांना दिल्या जाणार्या भेटवस्तूंच्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
शाळेच्या म्हणण्यानुसार, अरुण सरनाईक व त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते मंगळवारी शिवकृपा माध्यमिक विद्यालयात आले होते. सुरुवातीला आमदार निधीतून शाळेला छपाई यंत्र (प्रिंटर) देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षकांसाठी कौटुंबिक भेट म्हणून पैठणी आणि प्रत्येकी 2,000 रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शिक्षकांनी ही भेट घेण्यास नकार दिला.
शिक्षकांनी यावेळी भेट स्वीकारण्याऐवजी आपली भूमिका स्पष्ट केली. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा घटक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात भेटवस्तू किंवा पैशांच्या माध्यमातून शिक्षकांशी संबंध जोडण्याची पद्धत योग्य नाही, अशी भूमिका शिक्षकांनी मांडल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
मागील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळात पैठणी वाटपाच्या आरोपांवरून मोठी चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यावेळीही पैठणी देण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षकांनी अधिक स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. मागील निवडणुकीत पैठणी वाटपाच्या आरोपांवरून आ. किरण सरनाईक यांच्याबाबत राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा झाली होती.भेट स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरही संबंधित वस्तू तत्काळ परत नेण्यात आल्या नाहीत आणि त्या शाळेच्या परिसरातच राहिल्या, असा दावा शाळेने केला आहे. त्यानंतर शिक्षकांनी सर्वानुमते या वस्तू स्वतःकडे न ठेवता गरजू महिलांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जेवड नगर, छत्री तलाव परिसरातील सुख-शांती वृद्धाश्रमातील गरजू भगिनींना पैठण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मिळालेली रोख रक्कम वृद्धाश्रमाकडे जमा करून त्याची पावती घेण्यात आली.
या निर्णयातून शिक्षकांनी भेट नाकारण्याबरोबरच त्या वस्तूंचा उपयोग गरजूंसाठी करण्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यामुळे या घटनेची चर्चा केवळ एका शाळेपुरती मर्यादित न राहता शिक्षकांच्या स्वाभिमानाशी जोडली जात आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांचा मुद्दाही यानिमित्ताने पुढे आला आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना, वेतनश्रेणी, आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी, संचमान्यता, समायोजन, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न, अनुदान तसेच शिक्षकांवर असलेली अशैक्षणिक कामांची जबाबदारी या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याची गरज असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षकांना भेटवस्तू देण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर काय काम झाले, कोणती भूमिका घेतली आणि पुढे काय केले जाणार आहे, याची माहिती देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांवर काम केल्याचा दावा करणार्यांनी त्या कामाचा लेखाजोखा शिक्षकांसमोर ठेवावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या चर्चेत आहे. निवडणूक आयोगाने 2026 मधील शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून अमरावती विभागासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या मताचा आणि त्यांच्या भूमिकेचा मुद्दा पुन्हा महत्त्वाचा ठरत आहे.
शिक्षकांनी कोणतीही भेट स्वीकारावी किंवा नाकारावी, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, निवडणुकीत मतदान करताना उमेदवाराचे काम, शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका, केलेले प्रयत्न आणि सार्वजनिक कामाचा लेखाजोखा तपासून निर्णय घेण्याची भूमिका या घटनेतून पुढे आली आहे. शिक्षक हा केवळ मतदार नाही, तर समाज घडविणारा घटक आहे. त्याच्या हातात विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना भेटवस्तूंपेक्षा ठोस उत्तरांची गरज आहे, असा सूर शिवकृपा माध्यमिक विद्यालयातील या घटनेनंतर उमटला आहे. पैठणीची किंमत कितीही असली तरी शिक्षकाच्या स्वाभिमानाचे मोल पैशांत मोजता येत नाही, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला.
भेट नको प्रश्नांची ठोस उत्तरे हवीत -शिक्षकांच्या हातात पैठणी किंवा रोख रक्कम देण्यापेक्षा त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे गरजेचे असल्याची भूमिका शिवकृपा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी घेतली. जुनी निवृत्तीवेतन योजना, वेतनश्रेणी, आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी, संचमान्यता, समायोजन, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न, अनुदान आणि अशैक्षणिक कामांचा बोजा या प्रश्नांवर स्पष्ट उत्तरांची अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.
शिवकृपा हायस्कूलमध्ये आज काही व्यक्ती भेटीसाठी आल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार शाळेला आमदार निधीतून प्रिंटर देण्यात आला. त्यानंतर शिक्षकांसाठी कौटुंबिक भेट म्हणून काही वस्तू व रोख रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भेट नाकारण्याचा निर्णय अवमानासाठी नव्हता
आमच्या शाळेतील शिक्षकांनी सदर भेटवस्तू आणि रोख रक्कम वैयक्तिक स्वरूपात स्वीकारणे योग्य नाही, अशी भूमिका घेत ती स्वीकारण्यास नकार दिला. हा निर्णय कोणत्याही व्यक्तीचा अवमान करण्याच्या हेतूने घेण्यात आलेला नव्हता. शिक्षकांनी आपली भूमिका स्वाभिमानाने आणि शांतपणे मांडली. शिक्षकांनी स्वीकारण्यास नकार दिलेल्या वस्तू शाळेच्या परिसरात राहिल्यानंतर शिक्षकांमध्ये चर्चा करून त्या गरजू व्यक्तींना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जेवडनगर येथील सुख-शांती वृद्धाश्रमातील गरजू भगिनींना त्या वस्तू देण्यात आल्या. तसेच उपलब्ध झालेली रोख रक्कम वृद्धाश्रमास देण्यात आली असून त्याची पावती घेण्यात आली आहे. शिक्षक हा समाजात आदर्श निर्माण करणारा घटक आहे. त्यामुळे कोणतीही भेट स्वीकारायची किंवा नाकारायची हा प्रत्येक शिक्षकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आमच्या शाळेतील शिक्षकांनी त्या वेळी भेट स्वीकारण्याऐवजी ती समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला, एवढेच मी स्पष्टपणे सांगू इच्छितो.
– प्रदीप सहदेवराव नानोटे
मुख्याध्यापक, शिवकृपा हायस्कूल, अमरावती





