महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाची अशीही कर्तव्यदक्षता
लहान दुकानांवर कारवाई, तर मोठ्यांना अभय

* अतिक्रमण पथकाच्या या दुटप्पी कारवाईबाबत चर्चा
अमरावती / 12 फेब्रुवारी – शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी भाजी विक्री, फळ विक्रीचे दुकाने थाटुन लहान व्यवसायिक व्यवसाय करतात. मात्र त्यांच्यावर सतत महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या कारवाईची भीतीची टांगती तलवार असते. अनेकवेळा या विक्रेत्यांवर कारवाई होते. परंतू शहरातील अनेक मोठ्या प्रतिष्ठानांकडून सर्व नियम धाब्यावर बसवून अतिक्रमण केले असतांनाही त्यांच्यावर मात्र कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामूळे लहान दुकानांवर कारवाई तर मोठ्यांना मात्र अभय हीच मनपाच्या अतिक्रमण पथकाची कर्तव्यदक्षता आहे का? असा प्रश्न आता साहजिक उपस्थित झाला आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवरील फुटपाथवर अनेक भाजी विक्रेते, फळविक्रेते व चहाची टपरी टाकुन व्यवसाय करतात. कारण हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन असते. परंतू या मागचे वास्तव वेगळेच असून अनेक भाजी विक्रेत्यांकडून किंवा फळ विक्रेत्याकडून वसुली करण्यासोबतच भाजीपाला व फळे मोफत घेवुन जाण्याचाही प्रताप त्या विभागातील अतिक्रमण पथकातील कर्मचारी करतात. मात्र उगाच कारवाईचा बडगा नको म्हणून हे विक्रेते नाईलाजास्तव त्यांना खुश ठेवण्यासाठी आर्थिक फटका सहन करतात. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास शहरातील चौधरी चौकात भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी अतिक्रमण पथक आले होते. पथक दाखल होताच या विक्रेत्यांमध्ये एकच घबराहट पसरली. सर्व विक्रेते आपापल्या गाड्या घेवुन अक्षरशः सुसाट पळत असल्याचे चित्र होते. परंतू याचा मागोवा घेतला असता शहरातील जवाहरगेट, तखतमल इस्टेट, आराधना प्रतिष्ठान इथे मात्र सर्व फुटपाथ अतिक्रमण करुन गीळंकृत केले असतांनाही आजतागायत मनपा अतिक्रमण पथकाने त्यांच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. मग ते कोण लागुन गेले असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एकुणच छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करायची आणि बड्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची हा कुठला न्याय आहे ? आणि अतिक्रमण पथकाची अशी ही कर्तव्यदक्षता आहे का हा मुद्दा आता प्रामुख्याने पुढे आला आहे.
वाहनतळाकरिता जागा कुठे शोधायची ?
शहरातील जवाहरगेट, तखतमल इस्टेट, आराधना प्रतिष्ठान इथे गाड्यांसाठी फुटपाथच दिसत नाही. जो फुटपाथ आहे. तो संपूर्णपणे गीळंकृत झालेला आहे. तर वाहनतळासाठी नेहरू मैदान असल्याचे सांगितल्या जाते. परंतु आलेल्या नागरीकांना नेहरू मैदान येथे आपली वाहने उभी करणे शक्यच नाही. आणि नेहरू मैदानावर जर वाहन उभे केले तर तिथे सार्वजनिकरीत्या होणारे कार्यक्रम कसे होणार? या प्रश्नाची उत्तरे मिळायला हवी.




