रोबोडायनामिक’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे व्यावहारिक ज्ञान

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेसा व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचा संयुक्त उपक्रम

अमरावती/13 सप्टेंबर: अभियांत्रिकी क्षेत्रात रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा अनमोल अनुभव देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे दोन दिवसीय ‘रोबोडायनामिक’ कार्यशाळेचे दिमाखात आयोजन करण्यात आले. यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि ‘मेसा’ (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतःच्या हाताने रोबोटिक प्रणालींवर काम केले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोबोटिक्सची मूलभूत तत्त्वे, स्वयंचलित यंत्रणांची प्रत्यक्ष कार्यपद्धती, विविध घटकांची हाताळणी आणि प्रकल्पनिर्मितीच्या टप्प्यांचे सखोल प्रात्यक्षिक देण्यात आले. तेजस मेंढे व त्यांच्या मार्गदर्शक चमूने तांत्रिक सत्रांतून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बारकावे अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवले. प्रत्यक्ष प्रयोगाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. डॉ. ए. एम. महल्ले, यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. आर. आर. चौधरी आणि प्राध्यापक समन्वयक डॉ. शुभांगी कांबळे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पार पडला. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सची पाहणी करत त्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. ‘मेसा’चे विद्यार्थी अध्यक्ष रोहन चिकटे यांच्या नेतृत्वाखालील टीमने या संपूर्ण आयोजनाचे यशस्वी सूत्रसंचालन केले.

Back to top button