वलगावमध्ये जनावरांच्या वाहतुकीवरून राडा
शंकरपटाचे बैल नेणार्या चालकांना गोवंश तस्करांच्या संशयावरून मारहाण

पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला, तणाव कायम
वलगाव /11 फेब्रुवारी : तामसवाडी येथील शंकरपटातून बक्षीस जिंकून परतणार्या पंढरपुरी बैलांच्या गाडीला गोवंश तस्करांचे वाहन समजून गौरक्षकांनी पाठलाग करत अडवले आणि चालकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे वलगाव परिसरात दोन गटांत तीव्र संघर्ष निर्माण होऊन तणावाचे वातावरण पसरले होते, मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित शिवछत्रपती शंकरपटात वलगावच्या बैलांनी चौथे बक्षीस पटकावले होते. हे विजयी पंढरपुरी बैल एम.एच. 27 / एक्स – 8534 या क्रमांकाच्या वाहनातून वलगावकडे नेले जात होते. दरम्यान, एम.एच. 27 / डी ई – 6521 या क्रमांकाच्या गाडीतून आलेल्या गौरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना ही गोवंश तस्करी असल्याची चुकीची माहिती मिळाली. या संशयावरून त्यांनी तळेगाव जवळील बाबूजी हॉटेलपाशी गाडी थांबवून चालक शेख उमर शेख नवाब आणि धूरकरी शाहरुख अली कौसर अली यांना विचारपूस करत मारहाण केली. तिथून सुटका करून हे चालक वलगाव बस स्थानकावर पोहोचले असता, तिथेही त्यांना पुन्हा गाठून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे गावात दोन्ही बाजूचे नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि वातावरणात ठिणगी पडली. सुदैवाने, काही सुज्ञ नागरिकांनी वेळीच पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बैल आणि दोन्ही चालकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला असला, तरी परिसरात काही काळ भीतीचे सावट होते.




