केंद्रप्रमुख निवडीतून टीईटीची जाचक अट वगळा

शिक्षक समितीची खासदार आणि आमदारांकडे मागणी

अमरावती /23 मार्च : राज्यभरातील केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरताना शिक्षक पात्रता परीक्षेची अट पूर्णपणे रद्द करून केवळ गुणवत्तेच्या आधारावर नियुक्त्या देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. या संदर्भात अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने विधान परिषद सदस्य संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून पात्र शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही भूमिका संघटनेने मांडली आहे. विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे होणार्‍या केंद्रप्रमुख निवडीसाठी टीईटी अनिवार्य नसल्याचे स्पष्ट संकेत शासनाच्या मागील निर्णयांमध्ये देण्यात आले होते. तरीही निकाल जाहीर झाल्यानंतर ही नवी अट लादली जात असल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक अनुभवी आणि परीक्षेत उच्च गुण मिळवणार्‍या शिक्षकांनी ही पात्रता परीक्षा दिलेली नाही, त्यामुळे केवळ या तांत्रिक कारणामुळे गुणवंत शिक्षक संधीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परीक्षा परिषदेने अर्ज भरताना अशा अटीचा उल्लेख केला नव्हता, मग आताच ही अट का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. या निवेदनावेळी जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे आणि तालुकाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा विधिमंडळात करण्याची विनंती लोकप्रतिनिधींना केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button