रिफॉर्म क्लबच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनल आघाडीवर
प्रोग्रेसिव्ह आणि युनिटी पॅनलमध्ये काट्याची चुरस

* 59 टक्के मतदारांनी बजावला हक्क
* मतदारांचा कौल कोणाला याकडे जिल्ह्याचे लक्ष
अमरावती /22 फेब्रुवारी : स्थानिक प्रतिष्ठेच्या रिफॉर्म क्लबच्या निवडणुकीत रविवारी लोकशाहीचा मोठा उत्सव पाहायला मिळाला. प्रोग्रेसिव्ह पॅनल आणि युनिटी पॅनल या दोन तगड्या गटांमध्ये झालेल्या या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदासाठी दिवेश अग्रवाल आणि धनंजय बंड यांच्यात थेट संघर्ष असून, 1045 मतदारांपैकी 59 टक्के मतदारांनी आपला हक्क नोंदवला. जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. आता सर्वांच्या नजरा रात्री उशिरापर्यंत चालणार्या मतमोजणीकडे लागल्या असून रिफॉर्म क्लबचा नवा कारभारी कोण ठरणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अमरावतीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात आदराचे स्थान असलेल्या रिफॉर्म क्लबसाठी रविवारी स्थानिक विद्या भारती महाविद्यालयासमोर असलेल्या क्लबच्याच प्रांगणात मतदान पार पडले. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. प्रोग्रेसिव्ह पॅनलकडून अध्यक्षपदासाठी दिवेश अग्रवाल तर सचिवपदासाठी शरद चुटके हे मैदानात आहेत. त्यांच्या साथीला रमेश आसनानी, नितीन चेंडुलकर, डॉक्टर अश्विनकुमार देशमुख, महेश केवलरामानी, हेमंत लढ्ढा, डॉक्टर सुचिता देशमुख पांडे, सागर राऊत, अनिल विखे आणि डॉक्टर अतुल यादगिरे हे नऊ सदस्य आपले नशीब आजमावत आहेत. दुसरीकडे, युनिटी पॅनलचे नेतृत्व स्वतः धनंजय बंड करत असून त्यांनी अध्यक्षपदासाठी शड्डू ठोकला आहे. त्यांच्या पॅनलमधून सचिवपदासाठी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर राजेश जवाद तर सदस्य म्हणून माजी नगरसेवक पुरुषोत्तम बजाज, राहुल चढ्ढा, अंगद देशमुख, कैलास गिरोळकर, रवींद्र महल्ले, कैलास पडळकर, अमन तलडा, भरत तसरे आणि डॉक्टर राजेश उताणे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेर्यांपासूनच दोन्ही गटांमध्ये कमालीची ओढाताण पाहायला मिळत आहे. आठव्या फेरीअखेर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, प्रोग्रेसिव्ह पॅनलचे सागर राऊत 280 मतांसह आघाडीवर असून डॉक्टर सुचिता पांडे यांनी 256 मते मिळवली आहेत. त्यांच्या मागोमाग हेमंत लढ्ढा 245, नितीन चेंडुलकर 242 आणि डॉक्टर अश्विनकुमार देशमुख 223 मतांवर आहेत. युनिटी पॅनलकडूनही उमेदवारांनी कडवी झुंज दिली असून राहुल चढ्ढा 234 मतांनी आघाडीवर आहेत. पुरुषोत्तम बजाज 224, अंगद देशमुख 197, कैलास गिरोळकर 196 आणि अमन तलडा 195 मते घेऊन शर्यतीत कायम आहेत. नऊ सदस्यांच्या या प्रक्रियेनंतर सचिव आणि सर्वात शेवटी अध्यक्षपदाचा निकाल स्पष्ट होणार आहे. अमरावतीकरांसाठी ही केवळ निवडणूक नसून प्रतिष्ठेची लढाई बनली आहे, त्यामुळे निकालाच्या प्रत्येक फेरीगणिक चुरस अधिकच वाढत चालली आहे.
रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू -रिफॉर्म क्लबच्या सत्तेसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. रात्री 1 वाजता दरम्यान 8 व्या फेरीचा निकाल हाती आला असून 9 व्या फेरीची मोजणी सुरू झाली आहे. सदस्य पदांच्या निकालावरच सचिव आणि अध्यक्षपदाचे गणित अवलंबून असल्याने दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये कमालीची धाकधूक वाढली आहे. कोण मारणार बाजी, याचा फैसला आता काही तासांतच होणार आहे.




